पाकिस्तानच्या रमीझ खानचे रोखठोक मत
‘‘पाकिस्तानकडे गुणवत्तेची खाण आहे. पीळदार शरीरसंपदा असलेल्या शरीरसौष्ठवपटूंची आमच्याकडे कमतरता नाही. अरनॉल्ड क्लासिक किंवा युरोपातील स्पर्धामध्ये पाकिस्तानच्या शरीरसौष्ठवपटूंनी सुवर्णपदक पटकावलेले आहे, पण ते दुसऱ्या देशांचे प्रतिनिधित्व करून. दहशतवाद, देशाचे आणि धर्माचे नियम, आर्थिक अनास्था, अन्य देशांशी दुरावलेले संबंध, देशात खेळावर असलेली बंदी यामुळे खेळाचा खेळखंडोबा झाला आहे आणि याला जबाबदार राजकारणच आहे,’’ असे पाकिस्तानचा शरीरसौष्ठवपटू रमीझ खान रोखठोकपणे सांगत होता.
‘‘राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे एक तर शरीरसौष्ठवपटूंना संधी मिळत नाही किंवा त्यांना दुसऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करावे लागते. आमच्या धर्मानुसार गुडघ्याच्या खालपर्यंत कपडे घालणे अनिवार्य आहे. त्यामुळे शरीरसौष्ठव म्हणजे अंगप्रदर्शन वाटते आणि आम्ही खेळाडू हे बंडखोर. देशात चांगले शरीरसौष्ठवपटू आहेत, पण त्यांना आर्थिक मदत कोणाचीच नाही. या खेळाबाबत जनजागृती होत आहे, लोकांची खेळाला गर्दी होत आहे. पण राजकारण्यांकडून आम्हाला मान मिळत नाही. त्यांच्या लेखी आम्ही देशाचे आणि धर्माचे नियम मोडीत काढत आहोत. त्यामुळे उद्या आमच्यावर कोणती वेळ येईल, हे सांगणे कठीण आहे,’’ असे रमीझने सांगितले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमुळे काही वेळा खेळाला फटका बसतो. या दोन देशांमधील राजकीय संबंध सुधारेपर्यंत एकमेकांशी खेळू नये, असे काही जणांचे मत आहे. पण रमीझला असे वाटत नाही. याविषयी तो म्हणतो की, ‘‘राजकारण एका बाजूला आणि खेळ एका बाजूला आहे. त्यामुळे खेळ आणि खेळाडू यांच्यावर या गोष्टींचा परीणाम होता कामा नये. राजकारण्यांनी त्यांचे डावपेच खेळावेत; पण त्याचा फटका आमच्यासारख्या खेळाडूंना बसतो. सहावी जागतिक स्पर्धा भारतात होती. आम्हाला स्पर्धेचे ठिकाण माहिती नव्हते. वर्षभर चांगली मेहनत घेतली. पाच-सहा लाखांपर्यंत खर्च केला. पण मुंबईतील या स्पर्धेत आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला. आर्थिक आणि आमच्या कारकीर्दीच्या नुकसानीला कोण जबाबदार आहे? आम्ही कोणाकडे नुकसानभरपाई मागायची? पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात हिंदू आणि मुसलमान गुण्यागोविंदाने राहतात, त्यांचा आदर्श आपण डोळ्यांपुढे ठेवायला हवा.’’
‘‘धर्माच्या नियमांमुळे आम्हाला पाकिस्तानात चांगली वागणूक मिळत नाही. त्यामुळे पाकिस्तानातील महिला तर या स्पर्धेत सहभागी होण्याचा विचारही करत नाहीत. जग बदलते आहे; पण आपण कुठल्या शतकात वावरत आहोत? हे सारे काय चालले आहे? पण याचा खेळाला फटका बसतो आहे. आता आपण साऱ्यांनीच मानसिकता बदलण्याची गरज आहे. प्रगती करण्यासाठी इतरांकडून काही तरी शिकण्याची गरज असते. पाकिस्तानची या खेळाबाबतची मानसिकता कधी बदलणार, याचीच आम्ही प्रतीक्षा करीत आहोत,’’ असा आशावाद रमीझने प्रकट केला.
या स्पर्धेविषयी रमीझ म्हणाला की, ‘‘पाकिस्तानकडून माझ्यासह आठ पुरुष शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची आम्हाला आकांक्षा आहे, पण सुवर्णपदक जिंकल्यावर अन्य देशांसारखे आमचे मायदेशात स्वागत होणार नाही याचीच खंत आहे.’’