चांगला क्रिकेटपटू बनण्यासाठी चांगला माणूस घडवायला हवा, हा वसा गेली ९० वर्षे नि:स्वार्थी, निर्लेप, प्रामाणिक आणि निस्सीमपणे जपतो आहे तो माटुंग्याच्या वीर मेजर रमेश दडकर मैदानातील दादर पारसी झोराष्ट्रीयन (दापाझो) हा क्लब. कुणाकडून एक छदामही न घेता गरीब मुलांना विनामूल्य क्रिकेट प्रशिक्षण देणारा, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारा, मैदान वाचवण्याबरोबर स्पर्धाचे पुनरुज्जीवन करणाऱ्या या क्लबने जाँटी ऱ्होड्ससारख्या महान क्रिकेटपटूलाही भुरळ घातली आणि त्यानेही गरीब मुलांना मोफत प्रशिक्षण देण्याचा वसा घेतला.
गरीब मुलांना चांगले क्रिकेट प्रशिक्षण मिळाले यासाठी १४ जून १९२६ रोजी क्लबची स्थापना झाली. जहाँगीर पिठावाला ऊर्फ मासा सेठ यांनी या क्लबचा पाया रचला. १९ डिसेंबर १९३५-३६ साली मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्थापना होत असताना दापाझोने संस्थापक सदस्याची भूमिका वठवली होती. त्या वेळी क्लब म्हणजे फक्त एक झोपडी होती, पण हीच झोपडी अनेकांसाठी क्रिकेटचे विद्यापीठ ठरली. रमाकांत देसाई, माधव मंत्री यांच्यापासून संजय बांगर यांच्यापर्यंत अनेक खेळाडू दापोझोमधून खेळले आहेत.
वेलिंगकर शिक्षण संस्थेचे संस्थापक असलेल्या आर. आर. शाहू राजा यांनी मासा सेठ यांना क्लबसाठी मंगेश भालेकर यांचे नाव सुचवले आणि १९७५ साली मासा सेठ यांनी भालेकर यांच्याकडे हा क्लब सुपूर्द केला. त्यानंतर दोन वर्षांत लालचंद राजपूत आणि चंद्रकांत पंडित यांना भालेकर यांनी क्लबमध्ये आणले आणि त्यांनी त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. १९७९ साली त्यांनी मैदान बचाव समितीच्या स्थापनेतही मोलाची भूमिका वठवली. मैदानांवर होणाऱ्या अतिक्रमणासाठी क्लबने दडकर मैदान ते शिवाजी पार्कपर्यंत मानवी साखळीच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका वठवली होती. खेळाडूंना मोकळ्या हवेत खेळता यावे, हा क्लबचा हेतू होता आणि आहे.
२७ जून १९७५ साली क्लबने गरीब मुलांना मोफत शिक्षण द्यायला सुरुवात केली, ज्या गोष्टीला यंदा चाळीस वर्षे पूर्ण झाली. मोफत प्रशिक्षण मिळते म्हणून सधन घरातील मुले यायला लागल्यावर ‘बृहन्मुंबई पालिकेच्या शाळेत शिकतात ते गरीब’ अशी सोपी व्याख्या क्लबने केली. आम्ही चांगला माणूस घडवतो, हे क्लबचे ब्रीदवाक्य असून त्यानुसार मुलांसाठी क्लबकडून मोफत अभ्यासिका चालवली जाते. यामध्ये त्यांना मोफत वहय़ा-पुस्तकांबरोबरच शिक्षकांचेही मार्गदर्शन दिले जाते. मोफत प्रशिक्षण घेत असताना मुलांनी खेळाच्या माध्यमातून खेळाचेच शिक्षण घ्यायला हवे, यासाठी क्लब प्रयत्नशील आहे. त्यामुळे खेळाडूंना खेळपट्टी बनवणे, पंचगिरी, गुणलेखन यांसारखे प्रशिक्षण देण्यात येते. गेल्या दहा वर्षांपासून दर वर्षी पाच गरीब मुलांना हा क्लब दत्तक घेतो. त्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्व शिक्षणाचा खर्चही क्लबकडून केला जातो.
२२-वर्षांखालील सी. के. नायडू स्पर्धेचे पुनरुज्जीवन करत त्यांनी १९९५ साली शालिनी भालेकर स्मृती स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेकडे रणजीची निवड चाचणी म्हणून पाहिले जाते. या क्लबने आतापर्यंत १२ रणजी खेळाडू घडवले असून त्यापैकी बऱ्याच जणांची भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे. १९९२ साली या क्लबचे नूतनीकरण करून चांगली वास्तू उभारण्यात आली.
रुस्तमजी बिल्डरने झोपडपट्टी पुनर्वसन करत असताना दडकर मैदानाच्या बाजूला असलेली भिंत जमीनदोस्त केली होती. यासाठी दापोझाने यशस्वी लढा दिला आणि भिंत बांधून घेतली. भिंत जमीनदोस्त करून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील रहिवाशांना पायवाट करून द्यायचा कंत्राटदाराचा घाट होता. यासाठी ५५ लाखांचा धनादेश आणि बरीच प्रलोभने त्यांनी क्लबला दाखवली, पण निस्सीमपणे क्रिकेटसाठी वाहिलेला हा क्लब प्रलोभनाच्या आहारी गेला नाही.
दापाझोचे नि:स्वार्थ कार्य पाहून सचिन तेंडुलकरने क्लबसाठी कोरा धनादेश सही करून दिला होता. तो धनादेश अजूनही क्लबमध्ये फ्रेम करून लावण्यात आला आहे. कुणाकडून एकही पैसा घ्यायचा नाही, हा वसा क्लब अजूनही जोपासत आहे. नव्वदी गाठल्यावरही चिरतरुण राहिलेला हा क्लब अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. क्रिकेटच्या माध्यमातून आदर्श नागरिक बनवण्याचा वसा जपणारा, समाजभान राखत क्रिकेटसाठी नि:स्वार्थीपणे झटणाऱ्या दापाझोला शतकासाठी शुभेच्छा.
prasad.lad@expressindia.com