भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवार यांनी पुन्हा अर्ज केला आहे. टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे पुन्हा अर्ज करण्याचा निर्णय घेतल्याचं रमेश पोवार यांनी सांगितलं. जर त्यांचा माझ्या प्रशिक्षणपद्धतीवर विश्वास असेल तर मला त्यांना नाराज करायचं नाही, त्यामुळे पुन्हा प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणं हे माझं कर्तव्य आहे. निर्णय अखेर बीसीसीआयच्या हातात आहे. संघातील इतर काही खेळाडूंचीही मला साथ आहे असंही पोवार म्हणालेत. मंगळवारी (दि.11) प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्यानंतर क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत पोवार बोलत होते.

संघातील वरिष्ठ क्रिकेटपटू मिताली राजसोबत झालेल्या वादानंतर 30 नोव्हेंबर रोजी रमेश पोवार यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. हंगामी प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ तीन महिन्यांनंतर संपुष्टात आल्यावर बीसीसीआयने संघाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी अर्ज मागवले आहेत. रमेश पोवारने पुन्हा अर्ज केला असला तरी मिताली राजसोबत झालेल्या वादामुळे पुन्हा पोवारची प्रशिक्षकपदी निवड होणे कठीण मानले जात आहे. या पदासाठी भारताचा माजी गोलंदाज मनोज प्रभाकर यानेही अर्ज केला आहे. माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्ज हा प्रशिक्षकपदसाठी इच्छुक असल्याचे समजतेय. हर्षल गिब्जसोबतच, माजी क्रिकेटपटू टॉम मूडी, डेव्ह व्हॉटमोअर, वेंकटेश प्रसाद, रे जेनिंग्ज हे देखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये असल्याचं बोललं जातंय.

प्रशिक्षकपदासाठी १४ डिसेंबरपर्यंत इच्छुक उमेदवार BCCI कडे अर्ज करु शकणार आहेत. २० डिसेंबरला भारताचे माजी खेळाडू कपिल देव आणि अंशुमन गायकवाड यांची समिती उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराशी बीसीसीआय दोन वर्षांचा करार करणार असून त्याला वार्षिक 3 ते 4 कोटी रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय हे प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रियेतील अंतिम निर्णय घेणार आहेत.

हरमनप्रित आणि स्मृती मंधानाचा पाठिंबा –

यापूर्वी हरमनप्रीत आणि स्मृतीने रमेश पोवारला पाठिंबा दर्शवला असून 2021 पर्यंत प्रशिक्षकपदी ठेवावं असं म्हटलं होतं. यासंबंधी त्यांनी पत्र लिहून रमेश पोवार पुन्हा एकदा प्रशिक्षकपदी असावेत अशी मागणी केली आहे. हरमनप्रीतने आपल्या पत्रात म्हटलं आहे की,  ‘मी टी-20 संघाची कर्णधार आणि एकदिवसीय संघाची उप-कर्णधार या नात्याने पोवार यांना पुन्हा एकदा प्रशिक्षकपदी नेमण्याचं आवाहन करते. पुढील टी-20 वर्ल्ड कपसाठी फक्त 15 महिने बाकी आहेत आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी फक्त एक महिना बाकी आहे. ज्याप्रकारे रमेश पोवार यांनी संघात बदल केले आहेत, ते पाहता त्यांना बदलण्यामागे कारण दिसत नाही’. रमेश पोवार यांनी पूर्णवेळ प्रशिक्षकपदी आणल्यापासून संघात सुधारणा झाल्याचं हरमनप्रीत आणि स्मृतीचं म्हणणं आहे. ‘रमेश पोवार सरांनी खेळाडू म्हणून आमच्यात सुधारणा केली आहे. त्यांनी टार्गेट ठेवण्यात आणि आपल्या क्षमतांना आव्हान देण्यास आम्हाला मदत केली. त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचा चेहराच बदलला आहे. तांत्रिक आणि धोरणात्मक दोन्ही पद्धतीने. त्यांनी आमच्यात जिंकण्याची भावना जागी केली आहे’, असंही हरनप्रीतने पत्रात म्हटलं आहे.