भारताचा स्क्वॉशपटू रमित टंडनचे प्रतिपादन

अव्वल मानांकित बोर्जा बोलॅनविरुद्धचा विजय माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. मात्र एका विजयाने मी हुरळून जाणार नाही. अजून मोठी मजल मारायची आहे, असा आत्मविश्वास रमित टंडनने व्यक्त केला. भारताचा अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोषालने सीसीआय आंतरराष्ट्रीय इंडियन स्क्वॉश स्पर्धा जिंकली, मात्र टंडनने आपल्या खेळाने सर्वाची मने जिंकली.

टंडनने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या बोलॅनला हरवण्याची किमया साधली. अव्वल मानांकित खेळाडूशी दोन हात करताना तुझी काय मानसिकता होती, असे विचारले असता तो म्हणाला, ‘‘प्रतिस्पर्धी फारसा महत्त्वाचा नसतो. तिथे मानांकनाला स्थान नसते. त्या दिवशी सर्वोत्तम खेळेल, तोच जिंकतो. प्रत्येक जण कसून सराव करत असतो. तसेच मेहनत घेत असतो. त्यामुळे कुणीही जिंकू शकतो. बोलॅन हा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू असला तरी मी माझा खेळ उंचावण्यावर भर दिला. यापूर्वी सराव केल्याने त्याच्या खेळाची थोडी कल्पना आली. १-२ अशा पिछाडीनंतरही मी विजयाची आशा सोडली नाही. शेवटच्या दोन गेममध्ये मी खेळ उंचावला आणि बाजी मारली.’’

बोलॅनवर मात करणाऱ्या रमितला उपांत्य फेरीत इजिप्तच्या दुसऱ्या मानांकित ओमर मोसादविरुद्ध खेळ उंचावता आला नाही. त्याची पाठदुखी बळावली. त्यामुळे लढत एकतर्फी झाली. याबाबत रमित म्हणाला, ‘‘गेल्या महिन्यात सॅन फ्रान्सिस्कोमध्ये माझी दुखापत सुरू झाली. त्यानंतर मी त्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेत पहिल्या लढतीपासूनच मला दुखापत जाणवायला लागली. मात्र बोलॅनविरुद्धची उपांत्यपूर्व लढत तब्बल ८९ मिनिटे चालली. उष्ण वातावरणात इतका वेळ खेळणे सोपे नाही. त्यामुळे पाठदुखीने उचल खाल्ली. मोसादविरुद्ध दुसऱ्या गेममध्ये मी थोडा वेळ विश्रांतीही घेतली. त्यानंतर माझा खेळ खालावला. यानंतर कतारमध्ये होणाऱ्या स्पर्धेत खेळेन. मात्र त्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करेन.’’

व्यावसायिक कारकिर्दीच्या पहिल्याच स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरीबाबत रमितने समाधान व्यक्त केले. ‘‘सीसीआयच्या कोर्टवर मी प्रथमच खेळलो. मुंबईतील ही माझी पहिलीच स्पर्धा होती. कारकिर्दीतील पहिल्या व्यावसायिक स्क्वॉश स्पर्धेची मोठी उत्सुकता होती. मला थेट प्रवेशिकेद्वारे प्रवेश देण्यात आला. मात्र उपांत्य फेरी गाठताना मी पात्रता सिद्ध केली. या स्पर्धेतील कामगिरी पाहता मला पुढील खेपेस थेट मुख्य फेरीत प्रवेश मिळेल. अजून मोठी मजल मारायची आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात चांगला खेळ करण्याला माझे प्राधान्य असेल.’’

सौरव घोषाल आणि रमित हे दोघेही कोलकातावासी आहेत. तसेच चांगले मित्रसुद्धा आहेत. याबाबत रमित म्हणाला, ‘‘सौरव हा मला मोठय़ा भावासारखा आहे. त्याच्यामुळे मी स्क्वॉशमध्ये आलो. तो एक चांगला सहकारी आहे. सौरवचे मला नेहमीच मार्गदर्शन लाभते. तसेच खूप शिकायला मिळते. भारताचा तो अव्वल खेळाडू आहे. मी हरलो तरी सौरव जिंकला. त्याच्या जेतेपदामुळे मी खूप आनंदी आहे.’’