इकेंटल (जर्मनी) : भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रविवारी इकेंटल चॅलेंजर टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

बिगरमानांकित रामकुमारला २६व्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकेच्या सातव्या मानांकित सेबॅस्टियन कोर्डाकडून ४-६, ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला. रामकुमारचा पराभव झाला असला तरी या वर्षांतील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. या उपविजेतेपदासोबतच त्याने जागतिक क्रमवारीत पहिल्या २०० मध्ये स्थान मिळवले आहे. त्याच्या क्रमवारीत ६० गुणांची भर पडली असून त्याला १८५वे स्थान मिळाले आहे.

पहिल्या सेटपासून रामकुमारने चुरस द्यायचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या सेटमध्ये तर ४-४ अशी बरोबरी होती. त्यामध्येच रामकुमारला पुढच्या गेममध्ये ४०-० अशी आघाडी मिळाल्याने ५-४ असा गुणफलक करण्याची संधी होती. मात्र तिथे सलग पाच गुण गमावत रामकुमारने सामन्यावरील नियंत्रण पूर्णपणे घालवले होते.

अंतिम फेरीत पाचव्यांदा पराभव

रामकुमार कारकीर्दीत पाचव्यांदा चॅलेंजर स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेतेपद पटकावू शकलेला नाही. याआधी तहलीस (एप्रिल २०१७), विनेत्का (जुलै २०१७), पुणे (नोव्हेंबर २०१७) आणि तैपेई (एप्रिल २०१८) येथील चॅलेंजर स्पर्धामध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.