वेस्ट इंडिजचा सलामीवीर आणि तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल याने काही दिवसांपूर्वी आपल्या यू ट्युब चॅनेलवरून माजी सहकाऱ्यावर टीकास्त्र सोडले होते. कॅरेबियन प्रिमीयर लीग स्पर्धेत गेल अनेक वर्षे जमैका तल्हायवाज संघाकडून खेळत होता, पण यंदा त्याला तल्हायवाज संघाने सोडचिठ्ठी दिली आणि तो सेंट ल्युसिया झोक्स संघात दाखल झाला. जमैका तल्हायवाज संघातून गेलला काढण्याचा डाव त्याचा माजी सहकारी रामनरेश सरवान याचाच होता असा दावा गेलने केला. तल्हायवाज संघाच्या व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांचे सरवानने कान भरले आणि परिणामी गेलला संघाबाहेर व्हावे लागले, असा आरोप गेलने केला. गेलचा राग अनवार झाल्याने त्याने सरवानला ‘सापा’ची उपमा दिली. तसेच लोकांच्या पाठीत सुरा खुपसणं कधी बंद करणार असा सवालही ख्रिस गेलने त्याला केला.

“द्रविडमुळे मुंबईत त्रिशतक हुकलं”; सेहवागने लावला होता आरोप

माजी क्रिकेटपटू रामनरेश सरवानने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत गेललाच त्याच्या भूतकाळाची आठवण करून दिली. “ख्रिस गेलने माझ्यावर लावलेले आरोप अत्यंत दुर्दैवी आहेत. माझ्यावरचा एकही आरोप मला मान्य नाही. संघनिवडीच्या किंवा खेळाडूंना करारबद्ध करण्याच्या प्रक्रियेशी माझा काहीही संबंध नाही. त्याने लावलेले सारे आरोप खोटे असून त्यात त्याने खूप लोकांवर चिखलफेक केली आहे. मी ख्रिस गेलने आरोप केले म्हणून उत्तर देत नाहीये, तर लोकांना खरं काय ते कळावं म्हणून प्रतिक्रीया देतो आहे. मी गेलसोबत संघात खेळलो आहे. मी त्याला कायमच जवळचा मित्र मानतो. त्यामुळेच त्याने केलेले आरोप धक्कादायक आहेत. जेव्हा महिला पत्रकाराबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावरून गेलवर क्रिकेटबंदी ओढवण्याची शक्यता होती. तेव्हा मी स्वत: त्याच्या बाजूने उभा राहिलो होतो आणि त्याची पाठराखण केली होती, हे चाहत्यांना नक्कीच लक्षात असेल”, अशा शब्दात त्याने गेलला सुनावलं.

लाजिरवाण्या ११ खेळाडूंच्या यादीत मुंबईकर अजित आगरकरचं नाव; जाणकार, चाहते संतापले

नक्की काय होता गेलचा आरोप

“सध्याच्या घडीला, सरवान, तू करोना व्हायरसपेक्षाही घातक आहेस. तल्हायवाज संघात काय घडलं याची मला चांगलीच कल्पना आहे. कारण त्या संघात तुझ्या मताला खूप किंमत आहे. तुझं तल्हायवाज संघाच्या मालकांशी अगदी घट्टा नातं आहे, याची साऱ्यांनाच कल्पना आहे. आपण दोघं मित्र आहोत असं तू नेहमी म्हणतोस पण मी केलेला साधा फोनही तू उचलत नाहीस. माझ्या मागच्या वाढदिवशी जमैकामध्ये तूच आपल्या संघाबाबत आणि माझ्याबाबत स्टेजवर चढून चांगलं बोलला होतास. पण सरवान, तू साप आहेस हे आता मला कळून चुकलं आहे. तु अजूनही लहान मुलांसारखा अपरिपक्व आहेस. तू अजूनही लोकांच्या पाठीत सुरा खुपसतो आहेस. तू ही गोष्ट कधी बंद करणार आहेस?”, या शब्दात ख्रिस गेलने आपला संताप व्यक्त केला होता.