राओनिकचे आव्हान संपुष्टात; रामोस व्हिनोलासचा खळबळनजक विजय
जेतेपद कायम राखण्यासाठी आतूर स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत वाटचाल केली, तर आठव्या मानांकित मिलास राओनिकला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. महिलांमध्ये अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सने दिमाखदार विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठली.
व्हिक्टर ट्रॉइकीने वॉवरिन्काला विजयासाठी झुंजवले. वॉवरिन्काने ही लढत ७-६ (७-५), ६-७ (७-९), ६-३, ६-२ अशी जिंकली. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने चौथ्या फेरीत वाटचाल केली. चारही ग्रँड स्लॅम जेतेपदांवर नाव कोरण्यासाठी आतुर जोकोव्हिचने इंग्लंडच्या अ‍ॅलिझ बेडनेवर ६-२, ६-३, ६-३ अशी मात केली. कारकीर्दीत ग्रँड स्लॅम जेतेपदांचे वर्तुळ पूर्ण करणारा जोकोव्हिच केवळ आठवा खेळाडू ठरू शकतो. दुखापतींमुळे रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनी माघार घेतल्यामुळे जोकोव्हिचचा जेतेपदाचा मार्ग सुकर झाला आहे. आठव्या मानांकित मिलास राओनिकला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. स्पेनच्या अल्बर्ट रामोस व्हिनोलासने राओनिकला नमवत सनसनाटी विजयाची नोंद केली. स्पेनच्या रामोस व्हिनोलासने राओनिकवर ६-२, ६-४, ६-४ अशी मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. २८ वर्षीय रामोसने कारकीर्दीत आतापर्यंत कुठल्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेची दुसरी फेरीही ओलांडलेली नाही. २०११नंतर प्रथमच रामोसने ग्रँड स्लॅम सामना जिंकण्याची किमया केली आहे.
‘‘मी सलग चार वर्ष मी हरत होतो. त्यामुळे हा विजय सुखावणारा आहे. राओनिकविरुद्धचा सामना रंगतदार झाला. ढगाळ वातावरणामुळे कोर्टचा वेग मंदावला,’’ असे रामोसने सांगितले. उपांत्यपूर्व फेरीत रामोससमोर स्टॅनिसलॉस वॉवरिन्का आणि व्हिक्टर ट्रॉइकी यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
महिलांमध्ये चौथ्या मानांकित गार्बिन म्युग्युरुझाने स्वेतलाना कुझनेत्सोव्हाला ६-३, ६-४ असे नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांमध्ये अमेरिकेच्या बिगरमानांकित शेल्बी रॉजर्सने २५व्या मानांकित इरिना कॅमेलिआ बेगूचा ६-३, ६-४ असा सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

बोपण्णा, पेस उपांत्यपूर्व फेरीत
सहाव्या मानांकित रोहन बोपण्णा आणि त्याचा सहकारी फ्लोरिन मर्गेआ जोडीने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. बोपण्णा-मर्गेआ जोडीने मार्कस डॅनियल आणि ब्रायन बेकर जोडीवर ६-२, ६-७ (४), ६-१ असा विजय मिळवला. लिएण्डर पेस आणि मार्सिन मॅटकोव्हस्की जोडीने ब्रुनो सोरेस आणि जेमी मरे जोडीवर ७-६ (५), ७-६ (४) अशी मात केली.