सौराष्ट्रचा पहिला सामना इंग्लंडने जिंकून वर्षांची सुंदर सुरुवात इंग्लंडने केली खरी, पण कोचीत त्यांची पुरती गोची करत धोनी सेनेने दुसरे युद्ध जिंकत मालिकेत बरोबरी साधली. आता साऱ्यांच्याच नजरा असतील त्या धोनीच्या घरच्या मैदानात रंगणाऱ्या पहिल्या आणि मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर. कारण दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेऊन मालिकेत कुरघोडी करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. दुसऱ्या सामन्यातील खेळ पाहिल्यास भारताच्या संघाचे मनोबल विजयाने नक्कीच उंचावलेले असेल, त्यामुळे ‘विजयाची ही घडी अशीच राहू दे’ अशी आशा तमाम भारतीयांची त्यांच्याकडून असेल. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ मालिकेत पुनरागमन करण्यासाठी नक्कीच उत्सुक असेल.
दुसऱ्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सुरेश यांनी चांगली फलंदाजी केल्यामुळे भारताला २८५ धावा उभारता आल्या होत्या. तर गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमारने अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला होता, तर त्याला आर. अश्विन आणि जडेजा यांची चांगली साथ लाभली होती. पण या विजयानंतरही संघापुढचे काही प्रश्न सुटलेले नाहीत. संघाला अजूनही चांगली सलामी मिळालेली नाही. गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे या दोन्ही सलामीवीरांना आपली छाप अजूनही पाडता आलेली नाही. या सामन्यानंतर उर्वरित दोन सामन्यांसाठी संघाची निवड करण्यात येणार असल्याने या दोघांसाठी ही अखेरची संधी असेल. गेल्या वर्षी ज्याने धावांची टांकसाळ उघडली होती, त्या विराट कोहलीला या वर्षांत मात्र सूर गवसलेला नाही. बऱ्याच दिवसांमध्ये त्याच्याकडून मोठी खेळी झालेली नाही. युवराज सिंगकडून मात्र संघाच्या नक्कीच मोठय़ा अपेक्षा असतील. धोनी सध्या भन्नाट फॉर्मात आहे, त्यामुळे त्याच्याकडून कामगिरीत सातत्य राखण्याची अपेक्षा असेल. रैना आणि जडेजा यांनी कामगिरीत सातत्य राखल्यास भारताला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारता येऊ शकते.
१९८४-८५ नंतर इंग्लंडचा संघ कसोटीपाठोपाठ एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक आणि बेल यांनी १५३ धावांची सलामी दिली होती. पण दुसऱ्या सामन्यात मात्र त्यांना जास्त धावा करता आल्या नाहीत. या दोघांपैकी एक जण जास्त काळ खेळपट्टीवर राहिला तर इंग्लंडचा संघ मोठय़ा धावसंख्येच्या दिशेने कूच करू शकतो. केव्हिन पीटरसन चांगल्या फॉर्मात असला तरी त्याला मोठी खेळी साकारता आलेली नाही. इऑन मॉर्गनला अजूनही हवा तसा सूर सापडलेला नाही. गोलंदाजीमध्ये जेम्स ट्रेडवेल हा भारताची डोकेदुखी ठरला आहे. अन्य गोलंदाजांचीही त्याला चांगली साथ मिळत असली तरी अखेरच्या षटकांमध्ये कशी गोलंदाजी करावी, हे त्रांगडे अजूनही सुटलेले नाही.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, शामी अहमद, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, अमित मिश्रा आणि अशोक दिंडा.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टक कुक (कर्णधार), इयान बेल, केव्हिन पीटरसन, जो रूट, इऑन मॉर्गन, क्रेग किइसवेटर, स्टिव्हन फिन, समित पटेल, ख्रिस वोक्स, जेम्स ट्रेडवेल, जेड डर्नबॅक, टिम ब्रेस्नन, डॅनी ब्रिग्स, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर आणि स्टुअर्ट मीकर.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स आणि स्टार क्रिकेट वाहिनीवर.
सामन्याची वेळ : दुपारी १२ वाजल्यापासून.