राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेती धावपटू कविता राऊत, कृष्णकुमार राणे, भाग्यश्री शिर्के, मोनिका आथरे यांच्यासह महाराष्ट्राच्या दहा खेळाडूंची आगामी आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा ३ ते ७ जुलै या कालावधीत पुण्यात होणार आहे.
बालेवाडी क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताच्या ११० खेळाडूंचा संघ शनिवारी घोषित करण्यात आला. त्यामध्ये ५७ पुरुष व ५३ महिलांचा समावेश आहे. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये ऑलिम्पिकपटू कृष्णा पुनिया, विकास गौडा, राष्ट्रकुल पदक विजेती सुधा सिंग, टिंटू लुका, प्रीजा श्रीधरन, मायूखा जॉनी आदी अनुभवी अ‍ॅथलिट्सना स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्राचे अनिरुद्ध गुजर, कृष्णकुमार राणे (१०० मी. धावणे व रिले), प्रतीक निनावे (२०० मी. धावणे), के. दिलीपकुमार (डेकॅथ्लॉन), मोहम्मद युनुस (५ हजार व १० हजार मी. धावणे), रामचंद्रन, सिद्धांत थिंगलिया (११० मी व ४०० मी. अडथळा शर्यत), भाग्यश्री शिर्के (१०० मी. व रिले), कविता राऊत व मोनिका आथरे (५ हजार व १० हजार मी. धावणे) हे खेळाडू आपले नशीब अजमावणार आहेत.