रंगना हेराथने सामन्यात घेतलेल्या दहा बळींच्या जोरावर श्रीलंकेने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एक डाव आणि ६ धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने पहिल्या डावात दिमुथ करुणारत्ने (१८६) आणि दिनेश चंडिमल (१५१) यांच्या शतकांच्या जोरावर ४८४ धावांची मजल मारली. वेस्ट इंडिजतर्फे देवेंद्र बिशूने ४ बळी घेतले. रंगना हेराथच्या ६ बळींच्या जोरावर श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा पहिला डाव २५१ धावांत गुंडाळला. भक्कम आघाडी मिळालेल्या श्रीलंकेने वेस्ट इंडिजला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. चौथ्या दिवशी २ बाद ६७वरून पुढे खेळणाऱ्या वेस्ट इंडिजचा दुसरा डाव २२७ धावांतच गडगडला. जेरमाइन ब्लॅकवूडने ९२ धावांची झुंज दिली. हेराथने ४ बळी घेतले. १० बळी घेणाऱ्या हेराथला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने १-० अशी आघाडी घेतली आहे.