कर्णधार राणी रामपालने अखेरच्या सत्रात केलेल्या एकमेव गोलच्या आधारावर भारतीय महिलांनी टोकियो ऑलिम्पिकला प्रवेश नक्की केला आहे. भुवनेश्वर शहरात पार पडलेल्या सामन्यात, अमेरिकन महिलांनी भारतीय संघावर ४-१ ने मात केली. दोन सामन्यांमधील एकूण गोलचा निकष लावता हा सामना बरोबरीत सुटण्याची शक्यता होती. मात्र राणी रामपालने ४८ व्या मिनीटाला भारताचा एकमेव गोल करत, संघाची ऑलिम्पिकवारी पक्की केली. शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारतीय महिलांनी अमेरिकेवर ५-१ ने मात केली होती.

अवश्य वाचा – Olympic Qualifiers Hockey : भारतीय संघाचं मिशन ऑलिम्पिक फत्ते

पहिल्या सत्रापासून आक्रमक खेळ केलेल्या अमेरिकन संघाने भारतीय महिलांवर वर्चस्व गाजवलं. आक्रमण आणि बचाव अशा दोन्ही क्षेत्रात उजवी कामगिरी करत अमेरिकेच्या महिलांनी गोल करण्याचा सपाटा लावत ४-० अशी आघाडी घेतली. अमांडा, कॅथलिन आणि अ‍ॅलेसा यांनी अमेरिकेकडून गोल केले. पाहुण्या संघाचा आक्रमक खेळ पाहता भारतीय महिलांचा ऑलिम्पिक प्रवेश हुकतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र राणी रामपालने आपला सर्व अनुभव पणाला लावत एकमेव गोल करत भारताचं ऑलिम्पिकमधलं स्थान पक्क केलं. एकूण गोलच्या निकषात भारताने अमेरिकेवर ६-५ अशी मात केली. ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र होण्याची भारतीय महिला हॉकी संघाची ही तिसरी वेळ ठरली आहे. याआधी १९८० आणि २०१६ साली भारतीय महिला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या.