पुढील महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये राणी रामपाल भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व करणार आहे. हॉकी इंडियाने सोमवारी ही नियुक्ती केली. पुढील महिन्याच्या २३ तारखेपासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. यासाठी काही दिवसांपूर्वी हॉकी इंडियाने १६ सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी कर्णधार कोण असेल, याची घोषणा करण्यात आली नव्हती.

संघाची बचावपटू दीप ग्रेस एक्का आणि गोलरक्षक सविता पुनिया यांना संघाची उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. राणी म्हणाली, “ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणे हा सन्मान आहे. वर्षानुवर्षे कर्णधार म्हणून माझी भूमिका सुलभ झाली आहे. मी या जबाबदारीसाठी तयार आहे आणि हॉकी इंडियाने मला हा सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.”

 

हेही वाचा – टोकियो ऑलिम्पिक : आयोजकांची मद्यपानास परवानगी, तर कंडोम वाटण्यास नकार

हॉकी इंडियाने सांगितले की, “सविता आणि दीप जवळपास एक दशक संघाचे सदस्य आहेत आणि नेतृत्व समूहाचा महत्त्वाचा भाग आहेत. २०१८मधील नवव्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट रँकिंग मिळविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.” भारतीय महिला संघाने गेल्या चार वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. संघाने २०१७ मधील आशिया चषक जिंकला होता, तर २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक पटकावले होते.

राणीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१८मध्ये लंडन येथे झालेल्या एफआयएच महिला विश्वचषची प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.