नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिला या वर्षीचा प्रतिष्ठेचा ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अ‍ॅथलीट’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पटकावणारी राणी रामपाल ही पहिली हॉकी खेळाडू ठरली आहे.

चाहत्यांकडून गेली २० दिवस मते मागवण्यात आल्यानंतर वर्ल्ड गेम्सने गुरुवारी पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. ‘‘राणीला वर्ल्ड गेम्सचा सर्वोत्तम अ‍ॅथलीटचा पुरस्कार जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. राणीने तब्बल १ लाख, ९९ हजार, ४७७ मते मिळवत या पुरस्काराच्या शर्यतीत अग्रस्थान पटकावले. जगभरातील ७ लाख, ५ हजार, ६१० चाहत्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूंना मते दिली होती,’’ असे ‘वर्ल्ड गेम्स’च्या पत्रकात म्हटले आहे.

‘‘संपूर्ण हॉकीक्षेत्राला, भारताला तसेच माझ्या संघसहकाऱ्यांना मी हा पुरस्कार समर्पित करते. चाहते, प्रशिक्षक, भारत सरकार यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळवू शकले. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने या पुरस्कारासाठी माझी शिफारस केल्याने त्यांचेही खूप खूप आभार,’’ असे राणीने सांगितले.