आपल्या गौरवशाली कारकिर्दीच्या अंतिम कसोटी मालिकेच्या तयारीसाठी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रणजी स्पर्धेची कास धरली आहे, पण आतापर्यंत अबोल राहणाऱ्या सचिनने या वेळी एक धाडसी विधान केले आहे. रणजी क्रिकेट महत्त्वाचे आहे, परंतु त्याद्वारे भारतीय संघात स्थान मिळू शकेल, याची शाश्वती देता येत नाही, असे वक्तव्य सचिनने केले आहे.
‘‘रणजी करंडक स्पर्धेतील चांगल्या कामगिरीची निवड समिती तुमची दखल घेऊ शकते, पण तुमची या कामगिरीच्या बळाच्या जोरावर भारतीय संघात निवड होईल, याची शाश्वती नाही. कारण राष्ट्रीय स्तरावर भरपूर स्पर्धा आहे. जर निवड समिती आणि कर्णधाराच्या पसंतीला तुम्ही उतरलात तरच तुमची वर्णी संघात लागू शकते,’’ असे सचिन म्हणाला.