चाळीस वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबई संघाला आज महाराष्ट्राने वानखेडे म्हणजेच घरच्या मैदानावरच हरवले. पहिल्या डावात १२२ धावांची पिछाडी असतानाही महाराष्ट्र जिगरबाज खेळी करत सामन्यात परतला आणि आठ गडी राखून जिंकला.  केदार जाधवचे झुंजार शतक आणि विजय झोलच्या अर्धशतकी खेळीमुळे महाराष्ट्राने मुंबईचा पराभव करत तब्बल १७ वर्षानंतर रणजीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.
आज सामन्याच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्राला झटपट गुंडाळून विजय मिळवण्याचा मुंबईचा मनसुबा होता. पण, महाराष्ट्राने मुंबई संघाचे हे इरादे पूर्ण होऊ दिले नाहीत. अखेर, महाराष्ट्राच्या फलंदाजांनी जिगरबाज खेळीचे दर्शन घडवत बलाढ्य मुंबईला रणजीतून बाहेर फेकण्याचा पराक्रम केला. युवा खेळाडूंनी भरलेल्या महाराष्ट्र संघाने आज चौथ्या दिवशी अधिक आक्रमक होत मुंबईला बॅकफुटवर ढकलले. महाराष्ट्राकडून केदार जाधव आणि १९ वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या विजय झोल यांनी तिसऱ्या विकेटसाठी २१५ धावांची अभेद्य खेळी करत महाराष्ट्राचा विजय साकारला. जाधवने नाबाद १२२ तर झोलने ९१ धावांची खेळी साकारली. विशेष म्हणजे रणजीच्या इतिहासात महाराष्ट्राने मुंबईवर मिळवलेला हा तिसराच विजय ठरला आहे. आता रेल्वे आणि पं. बंगाल यांच्यातील विजयी संघाशी महाराष्ट्राची उपांत्य सामन्यात इंदूरमध्ये गाठ पडणार आहे.