23 November 2020

News Flash

रणजी क्रिकेट : मुंबईवर डावाने पराभवाची नामुष्की, विदर्भाची घौडदौड सुरुच

विदर्भाकडून वासिम जाफरचं शतक

रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या संघाची अवस्था खराब झालेली आहे. नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात विदर्भाने मुंबईवर एक डाव आणि 145 धावांनी मात केली. पहिल्या डावात विदर्भाने केलेल्या 511 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढावली होती. यानंतर दुसऱ्या डावातही मुंबईच्या डावाची पुन्हा घसरगुंडी उडाली.

पहिल्या डावात फलंदाजीदरम्यान, वासिम जाफरने झळकावलेल्या 178 धावा आणि अथर्व तायडे-गणेश सतीश-मोहीत काळे या त्रिकुटाने झळकावलेली अर्धशतक ही विदर्भाच्या फलंदाजीची वैशिष्ट्यं ठरली. विदर्भाने पहिल्या डावात 511 धावांपर्यंत मजल मारली. विदर्भाच्या संघाला बाद करण्यासाठी मुंबईने चक्क 8 गोलंदाज वापरले. यामध्ये ध्रुविल मतकरला 5, शार्दुल ठाकूर-तुषार देशपांडेला प्रत्येकी 2-2 तर तनुष कोटीयनने 1 बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल मुंबईचे फलंदाज पहिल्या डावात अडखळले. जय बिस्ता, शुभम रांजणे आणि ध्रुविल मतकर यांनी अर्धशतक झळकावत संघाला 250 चा टप्पा ओलांडून दिला. मात्र इतर फलंदाजांनी पुरती निराशा केली. विदर्भाकडून अक्षय वाखरेने 5, आदित्य सरवटेने 3 तर अक्षय कर्णेवारने 2 बळी घेतले. मुंबईचा पहिला डाव 252 धावांवर आटोपल्यानंतर विदर्भाने मुंबईला फॉलोऑन दिला. मात्र दुसऱ्या डावात मुंबईची परिस्थिती आणखीनच गंभीर झाली. ध्रुविल मतकर, श्रेयस अय्यर आणि आदित्य तरे या तिघांचा अपवाद वगळता एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. अखेर मुंबईचा दुसरा डाव 114 धावांवर गारद झाला आणि विदर्भाने डावाने विजय संपादन केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2019 4:31 pm

Web Title: ranji cricket vidarbha beat mumbai by an inning and 145 runs
टॅग Mca,Ranji Cricket
Next Stories
1 बुमरहाने मला चुकीचं सिद्ध केलं – कपिल देव
2 T-20 World Cup 2020 : श्रीलंका-बांगलादेशवर पात्रता फेरी खेळण्याची नामुष्की
3 IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या गोटात चिंता, जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकणार ?
Just Now!
X