अननुभवी गोलंदाजांचा फटका; श्रीवास्तव-हिरवानीने सामना अनिर्णित राखला

अखेरच्या सत्रात विजयासाठी फक्त चार बळी मिळवण्याची आवश्यकता असताना गोलंदाजांमधील अनुभवाची कमतरता आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचा मुंबईला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात फटका पडला. आदित्य श्रीवास्तव (नाबाद १३०) आणि मिहीर हिरवानी (नाबाद ६९) या दोघांनी सातव्या गडय़ासाठी रचलेल्या १३१ धावांच्या भागीदारीच्या बळावर मध्य प्रदेशने मुंबईच्या विजयाचा घास हिरावून त्यांना सामना अनिर्णित राखण्यास भाग पाडले.

मुबंईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात शुक्रवारच्या २ बाद ४४ धावांवरून पुढे खेळताना मध्य प्रदेशला विजयासाठी ३६४ धावांची, तर मुंबईला विजयासाठी आठ बळींची आवश्यकता होती. त्यातच रमीझ खान (२८) दिवसाच्या तिसऱ्याच षटकात बाद झाला. परंतु चौथ्या क्रमांकावरील श्रीवास्तवने व्यंकटेश अय्यरच्या साथीने चौथ्या गडय़ासाठी १२६ धावांची भागीदारी रचून मुंबईच्या गोलंदाजांना सतावले.

उपाहारानंतर रॉयस्टन डायसने अय्यरचा (५९) अडथळा दूर केला, तर चहापानाला पाच षटके शिल्लक असताना दीपक शेट्टीने चार चेंडूंच्या अंतरात कर्णधार शुभम शर्मा (५) आणि यश दुबे (०) यांना माघारी पाठवून मध्य प्रदेशची ६ बाद १८३ धावा अशी अवस्था केली. मात्र त्यानंतर आलेल्या हिरवानीने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमणावर भर देत मुंबईच्या हातातून सामना हिरावला. चहापानानंतरच्या सत्रात दोघांनीही संयमी फलंदाजी करून संघाला ३०० धावांचा टप्पा गाठून दिला. यादरम्यान श्रीवास्तवने १३ चौकार आणि २ षटकारांसह शतक झळकावले. त्याशिवाय श्रीवास्तव १२८ धावांवर असताना सीमारेषेजवळ अंकुश जैस्वालने त्याचा झेल सोडल्याने मुंबईपासून विजय अधिक दूर गेला. अखेरीस खेळ संपण्यासाठी अवघे एक षटक शिल्लक असताना दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सामना अनिर्णित राखण्यातच समाधान मानले. मध्य प्रदेशने दुसऱ्या डावात ६ बाद ३१४ धावा केल्या. चहापानानंतर शेट्टीला फक्त दोनच षटके गोलंदाजी देण्याचा निर्णयसुद्धा मुंबईच्या अंगलट आल्याची चर्चा सामन्यानंतर क्रीडाप्रेमींमध्ये रंगली होती.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ४२७

*  मध्य प्रदेश (पहिला डाव) : २५८

*  मुंबई (दुसरा डाव) : ५ बाद २३८ डाव घोषित

*  मध्य प्रदेश (दुसरा डाव) : ११२ षटकांत ६ बाद ३१४ (आदित्य श्रीवास्तव १३०*, मिहीर हिरवानी ६९*; दीपक शेट्टी २/४६)

*  सामनावीर : सर्फराज खान

फलंदाजांना पोषक खेळपट्टीवर आमच्या गोलंदाजांनी प्रत्येक बळी मिळवण्यासाठी अखंड परिश्रम केले. परंतु कुठे तरी त्यांचा अनुभव कमी पडला. मात्र ही एक प्रक्रिया असून आगामी हंगामांमध्ये मुंबईच्या गोलंदाजीत आपल्याला अधिक सुधारणा पाहायला मिळेल. एकंदर हा रणजी हंगाम मुंबईसाठी निराशाजनक ठरला असला तरी सर्फराज, रॉयस्टन डायस, शाम्स मुलानी, शशांक अत्तार्डे या खेळाडूंच्या कामगिरीविषयी मी समाधानी आहे.

-आदित्य तरे, मुंबईचा कर्णधार

विजयानंतरही महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात

बारामती : मध्यमगती गोलंदाज आशय पालकर (३/४४) आणि अष्टपैलू सत्यजीत बच्छाव (३/४९) या दोघांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘क’ गटातील अखेरच्या साखळी लढतीत उत्तराखंडवर ६७ धावांनी विजय मिळवला. परंतु तरीही महाराष्ट्राचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून ‘क’ गटातून जम्मू-काश्मीर आणि ओदिशा या संघांनी अनुक्रमे ३९ आणि ३८ गुणांसह बाद फेरी गाठली. महाराष्ट्राला ३४ गुणांसह पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

संक्षिप्त धावफलक

*  महाराष्ट्र (पहिला डाव) : २०७

*  उत्तराखंड (पहिला डाव) : २५१

*  महाराष्ट्र (दुसरा डाव) : ३१३

*  उत्तराखंड (दुसरा डाव) : ८०.३ षटकांत सर्व बाद २०२ (कमल सिंग ५७, दिक्षांशू नेगी ३८; आशय पालकर ३/४४, सत्यजीत बच्छाव ३/४९) ’  सामनावीर : कमल सिंग