पहिल्या डावात आघाडीसाठी बडोद्याला २४० धावांची गरजच; दुसऱ्या दिवशी तीन शतकांची नोंद

१७८ चेंडूचा सामना करून १२० धावांची संयमी खेळी करणारा सलामीवर केदार देवधर आणि तडाखेबंद अर्धशतक झळकाविणारा कर्णधार इरफान पठाण यांच्यावर उत्तर प्रदेशविरूध्दच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात आघाडी मिळवून देण्यासाठी बडोदेकरांची आशा आहे. येथील अनंत कान्हेरे मैदानावर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा उत्तर प्रदेशच्या सर्वबाद ४८१ धावसंख्येला उत्तर देताना बडोद्याच्या पाच बाद २४२ धावा झाल्या असून ते अजून २३९ धावांनी पिछाडीवर आहेत.

रणजी सामन्यासाठी प्रचंड संख्येने गर्दी करणाऱ्या नाशिककरांना गुरूवारी तीन शतकांचे साक्षीदार होता आले. पहिल्या दिवसअखेर नाबाद राहिलेल्या उत्तर प्रदेशच्या कुलदीप यादव आणि सौरभ कुमार या दोघांनी सात बाद ३६० धावसंख्येवरून डाव पुढे सुरू केल्यावर पहिल्या तासाभरातच आपआपले शतक पूर्ण केले. कुलदीपने १९२ चेंडूत १३ चौकारांसह ११७, तर सौरभने १३६ चेंडूत १६ चौकारांसह १०५ धावा केल्या. शतक पूर्ण केल्यावर दोघेही चटकन बाद झाले. त्यामुळे उत्तर प्रदेशचा डाव आटोपण्याची चिन्हे दिसत असताना इम्तियाझ अहमदने ५२ चेंडूत पाच चौकार, दोन षटकारांसह ४१ धावांची स्फोटक खेळी केली. त्यामुळे उत्तर प्रदेश ४८१ पर्यंत मजल मारू शकला. बडोद्याकडून कर्णधार इरफान पठाण २१ षटकात १०० धावा देऊन एकही बळी मिळवू शकला नाही. सागर मंगलोरकर (८९ धावात तीन), बाबा पठाण (११६ धावात तीन) आणि ऋषी आरोटे (८१ धावात दोन) यांनी बळी घेतले.

केदार देवधर आणि ए. ए. वाघमोडे यांनी ८२ धावांची भागीदारी करीत बडोद्याला सुरेख सुरूवात करून दिली. वाघमोडे ३५ धावांवर बाद झाल्यावर बिनबाद ८२ वरून त्यांचा डाव पाच बाद १५१ असा गडगडला. उत्तर प्रदेश दुसऱ्या दिवशीच सामन्यावर पकड घेण्याची चिन्हे दिसत असताना गोलंदाजीत अपयशी ठरलेला कर्णधार इरफान बडोद्याच्या मदतीला धावून आला. सलामीवीर केदारबरोबर त्याने सहाव्या गडय़ासाठी ९१ धावांची नाबाद भागीदारी करीत संघाला पाच बाद २४२ पर्यंत नेऊन ठेवले. एका बाजुला पडझड सुरू असताना केदारने सुरेख शतक झळकाविले. इरफानने अवघ्या ५५ चेंडूत सात चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ५१ धावा करीत प्रेक्षकांच्या टाळ्या वसूल केल्या. उत्तर प्रदेशकडून प्रवीणकुमारला अवघा एक बळी मिळाल. इम्तियाझ अहमदने ५८ धावात तीन बळी घेतले.

 

डॉर्टमंडची नाटय़मय बरोबरी; गटात अव्वल; रिअल माद्रिद दुसऱ्या स्थानी

पॅरिस : बोरुसिया डॉर्टमंडने बुधवारी मध्यरात्री माद्रिदमध्ये झालेल्या नाटय़मय लढतीत गतविजेत्या रिअल माद्रिदला २-२ असे बरोबरीत रोखून ‘फ’ गटातील अव्वल स्थानासह चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये अंतिम १६ संघांत प्रवेश केला. दुसरीकडे एफसी पोटरे आणि सेव्हिल्ला यांनी बाद फेरीतील अंतिम दोन स्थानांवर आपला दावा मजबूत केला.

डॉर्टमंडने ०-२ अशा पिछाडीनंतर जोरदार पुनरागमन केले आणि उप-उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्यांसमोर खडतर आव्हान निर्माण केले आहे. मार्को रेऊस या सामन्याचा नायक ठरला. त्याने सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना बरोबरीचा गोल करून माद्रिदची अव्वल स्थानावर झेप घेण्याची संधी हिरावून घेतली. तत्पूर्वी, करिम बेंझेमाने (२८ व ५३ मि.) दोन गोल करत माद्रिदला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. डोर्टमंडच्या पिएरे-इमेरिक आयुबामेयांग (६० मि.) याने ही पिछाडी कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

डॉर्टमंडने साखळी सामन्यांत २१ गोल्सचा पाऊस पाडला. या स्पध्रेच्या इतिहासात साखळी सामन्यांत एका क्लबने केलेली ही सर्वाधिक गोलसंख्या आहे. ‘दुसऱ्या सत्रात माद्रिदकडे चांगल्या संधी चालून आल्या होता, परंतु आम्ही नशिबवान होतो. आयुबा दर्जेदार खेळाडू आहे आणि त्यामुळे बरोबरीच्या गोलमध्ये त्याचा ९९ टक्के, तर माझा एक टक्के वाटा आहे,’ असे रेऊस म्हणाला.

– सेव्हिल्लाने सात वर्षांत पहिल्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. ‘ह’ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात सेव्हिल्लाने लियॉन संघाला गोलशून्य बरोबरीत रोखून गटात दुसरे स्थान निश्चित केले. या संघांमधील पहिल्या सामन्यात १-० असा विजय मिळवल्यामुळे सेव्हिल्लाचे पारडे जड होते. या गटात युव्हेंट्सने डायनामो झाग्रेबवर २-० असा विजय मिळवत अव्वल स्थान कायम राखले. गोंझालो हिग्वेन आणि डॅनिएल रुगॅनी यांनी प्रत्येकी एक गोल केला.

– पदार्पणातच उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या इंग्लिश प्रीमिअर लीग विजेत्या लिस्टर सिटीला ‘ग’ गटातील अखेरच्या लढतीत पोर्तोने ०-५ असे पराभूत केले. १९८७ व २००४ साली युरोपियन अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या पोर्तोसाठी अ‍ॅण्ड्रे सिल्वा (६ व ६४ मि.), जीजस कोरोना (२६ मि.), यासिन ब्राहिमी (४४ मि.) व दिओगो जोटा (७७ मि.) यांनी गोल केले.