रणजी करंडक स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा प्रभारी संघनायक स्वप्निल गुगळे याने त्रिशतक गाठले असून अंकित बावणे याने आपले द्विशतक पूर्ण केले आहे. दोघांनीही साडेपाचशेहून अधिक धावांची भागीदारी रचली आहे. स्वप्निल आणि अंकित यांनी मैदानात जम बसवल्यामुळे दिल्ली संघासमोरील अडचणी वाढल्या आहेत. रणजी करंडक क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राने २ बाद २९० अशी धावसंख्या उभारली होती. त्यानंतर आज दोघांनीही न डळमळता दिल्लीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दिल्लीकडून तब्बल सात गोलंदाजांचा वापर करण्यात आला असून अद्यापही ही जोडी फोडण्यात त्यांना यश आलेले नाही.
वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीत महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, परंतु अल्पावधीत त्यांची २ बाद ४१ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. सलामीवीर हर्षद खडिवाले(१०) आणि चिराग खुराना (४) यांना नवदीप सैनीने सकाळच्या पहिल्या अर्ध्या तासातच बाद केले होते. त्यानंतर स्वप्निल गुगळे आणि अंकित बावणे यांनी मैदानात टिच्चून फलंदाजी करत संघाला सावरले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2016 4:24 pm