तब्बल ४१ वेळा रणजी करंडकावर आपलं नाव कोरलेल्या आणि स्थानिक क्रिकेटमध्ये खडूसआर्मी असं बिरुद मिरवणाऱ्या, मुंबईच्या संघाने यंदाच्या रणजी हंगामात पहिला विजय मिळवलेला आहे. मुंबईचे पहिले दोन सामने अनिर्णित राहिल्यामुळे या सामन्यात मुंबईला विजय मिळवणं आवश्यक होतं. या प्रमाणे खेळ करत मुंबईने ओडिशावर १२० धावांनी मात करत या हंगामातला आपला पहिला विजय संपादन केला.

अवश्य वाचा – प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पृथ्वीच्या शतकांचा चौकार

गोलंदाजी आणि फलंदाजीतली अष्टपैलू कामगिरी हे मुंबईच्या विजयाचं प्रमुख कारण ठरलं. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या ओडिशाला मुंबईने सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. पहिल्या डावात पृथ्वी शॉने केलेल्या शतकाच्या जोरावर मुंबईने २८९ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईच्या इतर फलंदाजांनी सामन्यात निराशा केली असली, तरीही मधल्या फळीतल्या फलंदाजांनी छोट्या-छोट्या भागीदाऱ्या करत मुंबईला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. या धावसंख्येचा पाठलाग करताना ओडिशाचा संघ मुंबईच्या आक्रमणासमोर तग धरु शकला नाही. धवल कुलकर्णी आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २-२ बळी घेत ओडीशाची सलामीची फळी कापून काढली. यानंतर अनुभवी अभिषेक नायर आणि विजय गोहीलने प्रत्येकी ३-३ बळी घेत ओडिशाला पहिल्या डावात १४५ धावांवर ऑलआऊट केलं.

अवश्य वाचा – Ranji Trophy : मयंक अग्रवालच्या साक्षीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्रिशतकांची पन्नाशी!

दुसऱ्या डावातही मुंबईच्या फलंदाजांची त्रेधा उडाली. मात्र मधल्या फळीत सिद्धेश लाडने ११७ धावांची खेळी करत ओडिशासमोर ४१३ धावांचं अवघड आव्हान ठेवलं. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने सलामीला ४६ धावा काढून संघाची आघाडी वाढवण्यात हातभार लावला. मात्र इतर फलंदाजांनीही पहिल्या डावाप्रमाणे निराशाच केली. दुसऱ्या डावात मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ओडिशाची सुरुवात काहीशी अडखळती झाली. मात्र ओडिशाचा कर्णधार गोविंद पोद्दारने तिसऱ्या क्रमांकावर ८७ धावांची खेळी करुन संघाचा पराभव लांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र अनुभवी गोलंदाज अभिषेक नायरने त्याचा त्रिफळा उडवत, मुंबईच्या विजयातला मोठा अडसर दूर केला. यानंतर शंतनू मिश्राचा अपवाद वगळता एकाही फलंदाजांने मुंबईच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला नाही. अखेर दुसऱ्या डावात ओडिशाला २९२ धावांवर ऑलआऊट करत मुंबईने सामन्यात १२० धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात मुंबईकडून धवल कुलकर्णी आणि आकाश पारकरने प्रत्येकी ३ बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यांना अभिषेक नायरने २ तर शार्दुल ठाकूर आणि विजय गोहीलने प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

अवश्य वाचा – रणजी सामन्यात पुजाराची कमाल, ७० वर्ष अबाधित असलेला विक्रम मोडला