15 August 2020

News Flash

रणजी क्रिकेटच्या मैदानात विदर्भाचा डंका, इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक

अंतिम फेरीत विदर्भाची दिल्लीशी गाठ

बलाढ्य कर्नाटकवर मात करत विदर्भाची रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत धडक

रणजी क्रिकेटच्या इतिहासात विदर्भाच्या संघाने इतिहासाची नोंद केली आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर सुरु असलेल्या उपांत्य सामन्यात विदर्भाने बलाढ्य कर्नाटकवर ५ धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत विदर्भाची गाठ दिल्लीच्या संघाशी पडणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात दिल्लीने बंगालवर मात केली होती.

रणजी करंडकाच्या या हंगामात विदर्भाच्या संघाने बड्या संघांना पराभवाचा धक्का दिला होता. उपांत्य सामन्यात फैज फजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाची सुरुवात मात्र चांगलीच अडखळती झालेली होती. अभिमन्यू मिथुन, विनय कुमार आणि श्रीनाथ अरविंद यांच्या माऱ्यासमोर विदर्भाचा संघ १८५ धावांमध्ये सर्वबाद झाला. पहिल्या डावात आदित्य सरवटेच्या ४७ आणि अनुभवी वासिम जाफरच्या ३९ धावांच्या जोरावर विदर्भाने १८५ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात कर्नाटकच्या अभिमन्यू मिथुनने विदर्भाचा निम्मा संघ गारद केला.

विदर्भाच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटकचीही पहिल्या डावात चांगलीच घसरगुंडी उडाली. मात्र करुण नायरची १५३ धावांची शतकी खेळी आणि त्याला चिदंबरम गौतमच्या ७३ धावांची खेळी करुन दिलेली साथ या जोरावर कर्नाटकने ३०१ धावांची मजल मारली. दुसऱ्या डावात विदर्भाच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत कर्नाटकच्या गोलंदाजीचा सामना केला. सलामीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर वासिम जामर, गणेश सतीश, अपूर्व वानखेडे आणि आदित्य सरवटे यांनी छोट्या-छोट्या भागीदाऱ्या रचत कर्नाटकासमोर १९८ धावांचं आव्हान ठेवलं.

विदर्भाने विजयासाठी दिलेलं आव्हान कर्नाटकचा संघ सहज पार करेल असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता. मात्र रजनीश गुरबानीने दुसऱ्या डावात कर्नाटकच्या ७ फलंदाजांना माघारी धाडत कर्नाटकच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. सामन्याच्या शेवटच्या दिवशी कर्नाटकला विजयासाठी अवघ्या ३० धावांची गरज होती. कर्णधार विनय कुमार, श्रेयस गोपाल आणि अभिमन्यू मिथुन यांनी झुंज देत विजयाचं पारडं आपल्याबाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र रजनीश गुरबानीने त्यांचे मनसुबे उधळून लावले. श्रीनाथ अरविंदला अपुर्व वानखेडेकडे झेल द्यायला भाग पाडत विदर्भाने अखेर या सामन्यात ५ धावांनी विजय मिळवला. विदर्भ विरुद्ध दिल्ली यांच्यातला अंतिम सामना २९ डिसेंबर ते २ जानेवारी इंदूरच्या होळकर मैदानात रंगणार आहे.

संक्षिप्त धावफलक – विदर्भ, पहिला डाव सर्वबाद १८५ आदित्य सरवटे ४७, वासिम जाफर ३९. कर्नाटक – अभिमन्यू मिथुन ५/४५, विनय कुमार २/३६. कर्नाटक पहिला डाव सर्वबाद ३०१ करुण नायर १५३, चिदंबरम गौतम ७३. विदर्भ – रजनीश गुरबानी ५/९४, उमेश यादव ४/७३

विदर्भ दुसरा डाव सर्वबाद ३१३ गणेश सतीश ८१, आदित्य सरवटे ५५. कर्नाटक – विनय कुमार ३/७१, श्रीनाथ अरविंद २/५६. कर्नाटक दुसरा डाव सर्वबाद १९२ विनय कुमार ३६, अभिमन्यू मिथुन ३३. विदर्भ – रजनीश गुरबानी ७/६८. विदर्भाचा ५ धावांनी विजय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2017 11:37 am

Web Title: ranji trophy 2017 vidarbha beat karnataka in thrilling encounter by 5 runs enters final in ranji trophy to face delhi
टॅग Karnataka,Vidarbha
Next Stories
1 लग्नाचे ठिकाण निवडणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न, भाजप नेत्यांना ‘गंभीर’ प्रत्युत्तर
2 #Throwback : युवराजला आठवला ‘तो’ क्षण…
3 चहलचा बळी चौकार
Just Now!
X