वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि तुषार देशपांडे यांनी दुखापतीतून सावरत विदर्भाविरुद्धच्या आगामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या लढतीसाठी मुंबई संघात पुनरागमन केले आहे.

नागपूरमधील जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ३० डिसेंबरपासून हा चारदिवसीय सामना सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात हैदराबाद येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात ठाकूरला पदार्पणाची संधी मिळाली होती. मात्र  दुखापतीमुळे तो क्रिकेटपासून दूर होता. देशपांडेसुद्धा दुखापतीवर उपचार घेत होता.

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने १५ सदस्यीय मुंबई संघाची घोषणा केली. यात शैलीदार फलंदाज सिद्धेश लाडकडे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे. ‘अ’ आणि ‘ब’ गटाच्या एकत्रित गुणतालिकेत मुंबईचा संघ सध्या १४व्या स्थानावर असून, त्यांच्या खात्यावर एकूण ११ गुण जमा आहेत.

मुंबई संघ

सिद्धेश लाड (कर्णधार), श्रेयस अय्यर, आदित्य तरे, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे, जय बिस्ता, विक्रांत औटी, शुभम रांजणे, एकनाथ केरकर, कर्श कोठारी, ध्रुमिल मटकर, तनुश कोटियान, मिनाद मांजरेकर, तुषार देशपांडे, रॉयस्टन डायस.