पहिल्या दिवशी विदर्भाच्या ४ बाद ३८९ धावा

मुंबईविरुद्धच्या रणजी सामन्यात विदर्भाचा आणि पूर्वीचा मुंबईचा फलंदाज वासिम जाफरने १९६ चेंडूंत १७८ धावांची तुफानी खेळी करीत भक्कम पायाभरणी केली. त्याच्या शतकामुळे विदर्भ संघाने पहिल्या दिवसअखेर ४ गडी गमावून ३८९ धावांपर्यंत मजल मारली आहे.

विदर्भाने घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र सलामीवीर आणि कर्णधार फैज फझल अवघी १ धाव काढून तंबूत परतला. शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर विलास औटीने त्याचा झेल घेतला. त्यामुळे विदर्भाचा निर्णय चुकतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु, दुसरा सलामीवीर अथर्व तायडेला सोबत घेऊन अनुभवी वासिम जाफरने १९९ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाचा धावफलक दोनशेच्या पल्याड नेऊन ठेवला.

शतकाला पाच धावा कमी असताना अथर्व (९५) ध्रुमिल मटकरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर जाफरने गणेश सतीशसमवेत पुन्हा शतकी भागीदारी रचली. अखेरीस ध्रुमिलच्याच गोलंदाजीवर जाफर (१७८)यष्टीरक्षक आदित्य तरेकडे झेल देऊन तो माघारी परतला. त्यानंतर आलेल्या अक्षय वाडकरलाही ध्रुमिलने त्रिफळाचीत करून माघारी पाठवले. दिवसअखेरीस गणेश ७७ धावांवर तर मोहित काळे ३३ धावांवर खेळत आहे. जाफरच्या तुफानी खेळीसह त्याने गणेश आणि अथर्वसमवेत रचलेल्या मोठय़ा भागीदारीमुळे विदर्भाला दिवसअखेर ४ बाद ३८९ धावा उभारणे शक्य झाले.

संक्षिप्त धावफलक

  • विदर्भ : पहिला डाव ४ बाद ३८९ (वासिम जाफर १७८, अथर्व तायडे ९५, गणेश सतीश नाबाद ७७; ध्रुमिल मटकर ३/९२)