स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या वासिम जाफरने गेल्या हंगामापासून विदर्भाचं प्रतिनिधीत्व करायला सुरुवात केली. वयाच्या चाळीशीमध्ये पोहचलेल्या वासिमने आपल्या अनुभवी फलंदाजीच्या जोरावर सलग दोन हंगामांमध्ये विदर्भाला रणजी करंडक मिळवून दिला. पहिल्या हंगामात दिल्ली तर दुसऱ्या हंगामात सौराष्ट्रावर मात करुन विदर्भाने रणजी क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. सामना संपल्यानंतर वासिम जाफरनेही विदर्भाकडून मिळालेली दोन रणजी विजेतेपद आपल्यासाठी खास असल्याचं बोलून दाखवलं.

अवश्य वाचा – रणजी करंडक : वासिम भाईंचा ‘दस का दम’

 

तंत्रशुद्ध फलंदाजी, कमालीचा संयम आणि खेळावरील निष्ठा या जोरावर वासिम जाफर रणजी क्रिकेटमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. यंदाच्या हंगामात वासिम जाफरने विदर्भाकडून हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. 2008-09 सालात मुंबईकडून खेळताना वासिम जाफरने 10 सामन्यांत 16 डावांमध्ये 1260 धावा केल्या होत्या. या हंगामात वासिमने 84 च्या सरासरीने 4 शतकं आणि 5 अर्धशतकं झळकावली होती. याच हंगामात वासिम जाफरने त्रिशतकही झळकावलं होतं.

अवश्य वाचा – बाप्पा, पोट्टे जिंकले ना ! विदर्भ सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक विजेता

दहा वर्षानंतर विदर्भाकडून खेळताना वासिमने आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवला आहे. 11 सामन्यांत 15 डावांमध्ये वासिम जाफरने 1037 धावा काढल्या आहेत. या हंगामात वासिम जाफरने 69.33 च्या सरासरीने 4 शतकं आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत. या हंगामात वासिमने 206 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. या विजयासह वासिम जाफरने दहा वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. या विजयानंतर वासिम जाफरपुढे आपल्या संघाला इराणी करंडकाचं विजेतेपद मिळवून देण्याचं मोठं उद्दीष्ट आहे.

अवश्य वाचा – रणजी करंडक : बापू नाडकर्णी, अजित वाडेकरांच्या पंक्तीत विदर्भाच्या फैज फजलला स्थान