डावखुरा फिरकीपटू जगदीश सुचितने केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर कर्नाटकने बुधवारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ‘अ’ गटातील साखळी सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव अवघ्या ११३ धावांत गुंडाळला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय महाराष्ट्राला महागात पडला. २ धावांवरच त्यांनी स्वप्निल गुगळे (१) व चिराग खुराना (०) यांना गमावले. त्यानंतर जय पांडे व गेल्या सामन्यातील शतकवीर ऋतुराज गायकवाड यांनी थोडाफार प्रतिकार केला. मात्र सुचितने ऋतुराजला ३९ धावांवर त्रिफळाचीत करीत महाराष्ट्राला पुन्हा अडचणीत टाकले. दुसऱ्या बाजूने रोनित मोरेने जय (२०) व कर्णधार राहुल त्रिपाठीचे (०) बळी मिळवीत सुचितला सुरेख साथ दिली. यष्टीरक्षक रोहित मोटवानीने अखेरीस ३४ धावांचे योगदान दिल्यामुळे महाराष्ट्राने किमान तीन आकडी धावसंख्या गाठली. सुचितने शेवटच्या तीन फलंदाजांना दोन षटकांच्या अंतरात बाद करीत महाराष्ट्राचा डाव ३९.४ षटकांतच संपुष्टात आणला.

प्रत्युत्तरात कर्नाटकने पहिल्या दिवसअखेर ३ बाद ७० धावा केल्या असून देगा निश्चल व सुचिथ अनुक्रमे ३२ व २ धावांवर खेळत आहेत.

संक्षिप्त धावफलक

  • महाराष्ट्र (पहिला डाव) : ३९.४ षटकांत सर्व बाद ११३ (ऋतुराज गायकवाड ३९; जगदीश सुचित ४/२६, रोनित मोरे २/१६).
  • कर्नाटक (पहिला डाव) : ४० षटकांत ३ बाद ७० (देगा निश्चल खेळत आहे ३२, कृष्णमूर्ती सिद्धार्थ ११; राहुल त्रिपाठी १/७).