पहिल्या डावात गुजरातच्या बिनबाद ४१ धावा

केदार जाधवच्या अनुपस्थितीत खेळताना महाराष्ट्राच्या फलंदाजांनी गुजरातच्या चिंतन गजा आणि पीयूष चावला यांच्या भेदक गोलंदाजीसमोर शरणागती पत्करली. त्यामुळे पुणे येथे सुरू असलेल्या या सामन्यात यजमान महाराष्ट्राचा पहिला डाव अवघ्या २३० धावांवर संपुष्टात आला. रणजी करंडक स्पर्धेतील या साखळी सामन्यात गुजरातने पहिल्या दिवसअखेर बिनबाद ४१ अशी मजल मारली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर गुजरातने नाणेफेकजिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चिंतन गजा याने सलामीवीर चिराग खुरानाला भोपळाही भोडू देण्याची संधी दिली नाही. स्वप्नील गुगळे आणि रुतुराज गायकवाड यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी रचत पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. गुगळे (२१) आणि कर्णधार अंकित बावणे (०) यांचा अडसर गजाने दूर केल्यानंतर रुतुराज आणि राहुल त्रिपाठी यांनी महाराष्ट्राचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी १२२ धावांची भागीदारी रचत महाराष्ट्राला सुस्थितीत आणून ठेवले.

चिंतन गजा आणि चावला यांनी महाराष्ट्राला एकापाठोपाठ धक्के देण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या फलंदाजांना मैदानावर टिकाव धरता आला नाही. अनुपम संकलेचा आणि आशय पारकर यांनी अनुक्रमे २३ आणि २४ धावांचे योगदान दिले, तरी महाराष्ट्राचा डाव २३० धावांवर संपुष्टात आला. रुतुराजने ७० तर त्रिपाठीने ६२ धावांची खेळी केली. गुजरातकडून चिंतन गजाने पाच तर पीयूष चावलाने तीन बळी मिळवले.

गुजरातने सावध फलंदाजी करत दिवसभरात महाराष्ट्राला यश मिळू दिले नाही. सलामीवीर कथन पटेल आणि चिंतन गजा यांनी दिवसअखेर बिनबाद ४१ धावा केल्या आहेत. पटेल २१ तर गजा १५ धावांवर खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक

  • महाराष्ट्र (पहिला डाव) : ६७.१ षटकांत सर्व बाद २३० (रुतुराज गायकवाड ७०, राहुल त्रिपाठी ६२; चिंतन गजा ५/५७, पीयूष चावला ३/३९)
  • गुजरात (पहिला डाव) : ८ षटकांत बिनबाद ४१ (कथन पटेल खेळत आहे २१, चिंतन गजा खेळत आहे १५)