17 July 2019

News Flash

स्वप्निल गुगळेच्या शतकामुळे महाराष्ट्राची दमदार मजल

२७ वर्षीय गुगळेने १९१ चेंडूंत १५ चौकारांसह आपली खेळी साकारली.

सलामीवीर स्वप्निल गुगळेच्या शतकी खेळीमुळे रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अ-गटात महाराष्ट्राने पहिल्या दिवशी पहिल्या डावात ३ बाद २९८ अशी दमदार मजल मारली.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सुरू झालेल्या या लढतीत मुंबईने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गुगळे (१०१) आणि चिराग खुराणा (७१) यांनी १४६ धावांची सलामी देत महाराष्ट्राच्या धावसंख्येचा पाया रचला. या दोघांनी अप्रतिम फटकेबाजी करीत मुंबईच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे यांची उणीव मुंबईला तीव्रतेने जाणवली.

२७ वर्षीय गुगळेने १९१ चेंडूंत १५ चौकारांसह आपली खेळी साकारली, तर खुराणाने १०६ चेंडूंत १२ चौकारांनिशी अर्धशतक नोंदवले. खुराणा बाद झाल्यानंतर जय पांडेने (६८ खेळत आहे) गुगळेसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. परंतु प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चौथे शतक साकारणाऱ्या गुगळेचा मध्यमगती गोलंदाज शुभम रंजनेने (३० धावांत २ बळी) त्रिफळा उडवला. पहिल्या दिवसाच्या अखेरीस पांडेसोबत कर्णधार राहुल त्रिपाठीने (२५*) नेटाने किल्ला लढवला.

संक्षिप्त धावफलक

  • महाराष्ट्र (पहिला डाव) : ८७ षटकांत ३ बाद २९८ (स्वप्निल गुगळे १०१, चिराग खुराना ७१; शुभम रंजने २/३०)

First Published on December 7, 2018 1:50 am

Web Title: ranji trophy 2018 9