दुसऱ्या साखळी सामन्यात कर्नाटकचे आव्हान

बेळगांव (कर्नाटक)

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नेहमीच वर्चस्व गाजवणाऱ्या मुंबई संघाला यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या ‘अ’ गटातील दुसऱ्या साखळी सामन्यात कर्नाटकला नमवण्यासाठी कर्णधार धवल कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबईचा संघ उत्सुक आहे.

रेल्वेविरुद्धच्या पहिली साखळी लढत मुंबईने अनिर्णित राखली, पण पहिल्या डावातील आघाडीवर मुंबईने तीन गुण मिळवले. कर्नाटकनेसुद्धा विदर्भाविरुद्धचा सामना अनिर्णित राखून पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण कमावले आहेत.

रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ यांच्यासारख्या खेळाडूंच्या अनुपस्थितीतही मुंबईची फलंदाजी बळकट असून अनुभवी आदित्य तरे, सिद्धेश लाड व युवा यशस्वी जैस्वाल यांचा मुंबईच्या संघात समावेश आहे. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेसह धवल व शाम्स मुलानी यांच्यावर मुंबईच्या गोलंदाजीची मदार आहे.

कर्नाटकचे नेतृत्व सांभाळणाऱ्या वेगवान गोलंदाज विनय कुमारवर संघाची भिस्त आहे, तर फलंदाजांमध्ये करुण नायरवर सर्वाच्या नजरा आहेत.