यंदाच्या रणजी हंगामात खराब सुरुवात करणाऱ्या मुंबईने बडोद्याविरुद्धच्या सामन्यात मोठ्या धडाक्याने सुरुवात केली आहे. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना मुंबईने पहिल्या दिवसाअखेरीस 8 गड्यांच्या मोबदल्यात 439 धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधार सिद्धेश लाड आणि प्रदीर्घ काळानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरने झळकावलेलं शतक हे पहिल्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं.

नाणेफेक जिंकून बडोद्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आदित्य तरे आणि विक्रांत औटी हे फलंदाज लवकर माघारी परतले. मात्र यानंतर मैदानात आलेल्या सिद्धेश लाड आणि श्रेयस अय्यरने संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी बडोद्याच्या गोलंदाजाचा समाचार घेत शतकी खेळी केली. श्रेयस अय्यरने 17 चौकार आणि 11 षटकारांच्या सहाय्याने 178 धावा पटकावल्या. कर्णधार सिद्धेश लाडनेही 130 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. श्रेयस अय्यर माघारी परतल्यानंतर मधल्या फळीत शुभम रांजणे आणि शिवम दुबे यांनीही छोटेखानी खेळ करत मुंबईला 400 धावांचा टप्पा गाठून दिला.

बडोद्याकडून रणजी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्याने मुंबईच्या 3 फलंदाजांना माघारी धाडलं. फिरकीपटू भार्गव भटने 4 बळी घेतले. पहिल्या दिवशी मुंबईने आपली बाजू मजबूत केली असल्यामुळे मुंबईचे उर्वरित दोन फलंदाज उद्याच्या खेळात किती धावांची भर घालू शकतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.