दीड दिवसांतच केरळचा धुव्वा; उमेश यादवचे पाच बळी

गेल्या वर्षी मिळालेले रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद हा योगायोग नसल्याचे विदर्भाने परत एकदा सिद्ध करून दाखवले. वायनाड (केरळ) येथे सुरू असलेल्या सामन्यात विदर्भाने केरळचा धुव्वा उडवत एक डाव आणि अकरा धावांनी विजय नोंदवत अंतिम फेरीत दमदार धडक दिली. उमेश यादवने तब्बल पाच गडी बाद करून विदर्भाच्या विजयाचा कळस रचला.

वायनाडच्या कृष्णगिरी स्टेडियमवर सुरू असलेल्या लढतीत शुक्रवारी विदर्भाने घातक मारा कायम ठेवत केवळ दीड दिवसांत लढत आटोपली. उमेश यादवने सामन्यात १२ बळी घेत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. विदर्भाने पहिल्या डावात १०२ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होताच विदर्भाचे तळातील फलंदाज झटपट बाद झाले, मात्र उमेश यादवने नाबाद १७ धावा केल्या. २०८ धावांवर विदर्भाची खेळी संपुष्टात आली.

दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेला केरळ ९१ धावांवर गारद झाला. सलामीवीर अरुण काíतकला (३५) यश ठाकूरने पायचीत केले. कर्णधार सचिन बेबीकडून मोठी खेळी अपेक्षित असताना तो चोरटी धाव घेताना त्याला अथर्व तायडेने शून्यावर धावबाद केले. विदर्भाची अंतिम लढत सौराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील विजयी संघाविरुद्ध ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

वर्षभर आम्ही विजयासाठी भरपूर मेहनत घेतली त्याचे फळ आम्हाला मिळाले. मात्र विजयापासून आम्ही एक पाऊल दूर आहोत. कर्नाटक आणि सौराष्ट्र मजबूत संघ आहेत. त्यामुळे विजय सोपा नसणार. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने मदानात उतरू !            – फैज फजल, कर्णधार विदर्भ

संक्षिप्त धावफलक

  • केरळ (पहिला डाव) : २८.४ षटकांत सर्व बाद १०६.
  • विदर्भ (पहिला डाव) : ५२.४ षटकांत सर्व बाद २०८ (फैज फजल ७५, वसीम जाफर ३४, अथर्व तायडे २३; वारिअर ५/५७, निधेश एम.डी. २/५३, बिसल थांपी ३/६४).
  • केरळ (दुसरा डाव) : २४.५ षटकांत सर्व बाद ९१ (अरुण काíतक ३६, सिजोमॉस जोसेफ १७; उमेश यादव ५/३१, यश ठाकूर ४/२८)