कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बंगालने कर्नाटकवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. १७४ धावांनी कर्नाटकवर मात करत बंगालने तब्बल १३ वर्षांनी रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २००७ साली बंगालने रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली होती, ज्यात मुंबईकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

कर्नाटकच्या संघाची या स्पर्धेतली कामगिरी ही वाखणण्याजोगी होती. त्यामुळे दोन्ही संघातला सामना हा तुल्यबळ होईल असा सर्वांचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात बंगालने फलंदाजी आणि गोलंदाजीत कर्नाटकवर कुरघोडी केली. पहिल्या डावात फलंदाजी करताना अनुस्तुप मुजुमदारच्या शतकी खेळाच्या जोरावर बंगालने ३१२ धावांपर्यंतची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल कर्नाटकचा संघ पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरला. उपांत्य फेरीसाठी कर्नाटकच्या संघात खास स्थान देण्यात आलेला लोकेश राहुलही फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. इशान पोरेल-आकाशदीप आणि मुकेश कुमार या त्रिकुटाने भेदक मारा करत कर्नाटकचा पहिला डाव १२२ धावांवर संपवला.

दरम्यान दुसऱ्या डावात बंगालच्या फलंदाजांचीही घसरगुंडी उडाली. सुदीप चॅटर्जी, अनुस्तुप मुजुमदार आणि अखेरच्या फळीत शाहबाज अहमदने छोटेखानी खेळी करत बंगालचा डाव सावरला. कर्नाटककडून अभिमन्यू मिथूनने ४, कृष्णप्पा गौथमने ३, रणजीत मोरेने २ तर प्रसिध कृष्णाने १ बळी घेतला. कर्नाटकला दुसऱ्या डावात विजयासाठी ३५२ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. मात्र मुकेश कुमारच्या भेदक माऱ्यासमोर कर्नाटकच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा हार मानली. देवदत्त पडीक्कलने ६२ धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न तोकडे पडले. अखेरीस १७४ धावांनी विजय मिळवत बंगालने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दुसऱ्या डावात बंगालकडून मुकेश कुमारने ६, इशान पोरेल-आकाशदीपने प्रत्येकी २-२ बळी घेतले.