भारतीय कसोटी संघातला महत्वाचा खेळाडू चेतेश्वर पुजाराने आपला चांगला फॉर्म कायम राखत, कर्नाटकविरुद्ध रणजी सामन्यात द्विशतकी खेळी केली आहे. राजकोटच्या मैदानावर पहिला सामना खेळताना, सौराष्ट्राने पहिल्यांदा फलंदाजी करत ५८१ धावांचा डोंगर रचला. पुजाराने या सामन्यात पहिल्या डावात २४८ धावांची खेळी केली, त्याला शेल्डन जॅक्सनने १६१ धावा करत चांगली साथ दिली.

या द्विशतकी खेळीदरम्यान पुजाराने ५ विक्रमांची नोंद केली आहे. जाणून घेऊयात पुजाराच्या या खेळीबद्दल…

१) कर्नाटकविरुद्ध प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना, २ किंवा त्यापेक्षा अधिक द्विशतकं झळकावणारा पुजारा दुसरा फलंदाज ठरलाय. याआधी व्ही.व्ही.एस.लक्ष्मणने अशी कामगिरी केली आहे.

२) प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये २०० वा सामना खेळण्याआधी, १३ द्विशतकं झळकावणारा पुजारा तिसरा फलंदाज ठरलाय. कर्नाटकविरुद्धचा सामना हा पुजाराचा १९८ वा प्रथमश्रेणी सामना ठरला. याआधी सर डॉन ब्रॅडमन आणि बिल पॉन्सफोर्ड यांनी अशी कामगिरी करुन दाखवली आहे.

३) रणजी करंडकात सर्वाधिक द्विशतकं झळकावणारे फलंदाज –

  • पारस डोग्रा – ९ द्विशतकं
  • अजय शर्मा – ७ द्विशतकं
  • चेतेश्वर पुजारा – ७ द्विशतकं
  • सुरेंद्र भावे – ६ द्विशतकं
  • अभिनव मुकुंद – ६ द्विशतकं
  • अशोक मल्होत्रा – ६ द्विशतकं

४) प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकं झळकावणारे क्रिकेटपटू –

  • चेतेश्वर पुजारा – १३
  • कुमार संगकारा – १३
  • युनूस खास – १२
  • जावेद मियाँदाद – १२
  • विजय मर्चंट – ११

५) प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे भारतीय क्रिकेटपटू –

  • ८१ – सचिन तेंडुलकर/सुनिल गावसकर
  • ६८ – राहुल द्रविड
  • ६० – विजय हजारे
  • ५७ – वासिम जाफर
  • ५५ – दिलीप वेंगसरकर आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण
  • ५४ – मोहम्मद अझरुद्दीन
  • ५० – चेतेश्वर पुजारा

६) चेतेश्वर पुजाराने या द्विशतकी खेळीदरम्यान, रणजी करंडक स्पर्धेत सहा हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. हा टप्पा पार करणारा तो ५० वा खेळाडू ठरला आहे.