हार्दिकचे पहिले शतक; मध्य प्रदेशला विजयासाठी अद्यापही ३६४ धावांची आवश्यकता

मुंबई : उदयोन्मुख सलामीचा फलंदाज हार्दिक तामोरेने (११३ धावा) साकारलेल्या प्रथम श्रेणी कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या शतकाच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘ब’ गटातील शेवटच्या साखळी सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. मुंबईने दिलेल्या ४०८ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवसअखेर मध्य प्रदेशची २ बाद ४४ धावा अशी अवस्था झाली असून अखेरच्या दिवशी विजयासाठी त्यांना तब्बल ३६४ धावांची आवश्यकता आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात गुरुवारच्या ७ बाद २०० धावांवरून पुढे खेळताना व्यंकटेश अय्यरला हंगामातील पहिले शतक झळकावण्याची नामी संधी होती; परंतु तो ९३ धावांवर अंकुश जैस्वालच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि तेथून मध्य प्रदेशचा पहिला डाव २५८ धावांवर आटोपला. फिरकीपटू जैस्वालने चार बळी पटकावत मुंबईला १६९ धावांची आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

दुसऱ्या डावात मुंबईने गेल्या डावातील शतकवीर आकर्षित गोमेलला (४) लवकर गमावले; परंतु या वेळी २२ वर्षीय हार्दिकने आकर्षितचा कित्ता गिरवला. त्याने सूर्यकुमार यादवसह (३८) दुसऱ्या गडय़ासाठी ५८ धावांची, तर शाम्स मुलानीसह (७०) चौथ्या गडय़ासाठी १३३ धावांची भागीदारी रचून मुंबईची एकूण आघाडी ४०० धावांपलीकडे नेली. चहापानानंतरच्या दुसऱ्याच षटकात पॉइंटच्या दिशेने चौकार लगावून हार्दिकने शतकाची वेस ओलांडली. १२ चौकार आणि १ षटकारासह ११३ धावा केल्यावर हार्दिक बाद झाला आणि मुंबईने ५ बाद २३८ धावांवर दुसरा डाव घोषित केला.

त्यानंतर दुसऱ्या डावात मध्य प्रदेशला मुलानी-जैस्वाल यांच्या फिरकी जोडीने प्रत्येकी एकेक धक्का देत त्यांना २ बाद ४४ धावा अशा संकटात टाकले आहे. दिवसअखेर रमीझ खान २७, तर आदित्य श्रीवास्तव १ धावेवर खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक

’मुंबई (पहिला डाव) : ४२७

’मध्य प्रदेश (पहिला डाव) : २५८

’मुंबई (दुसरा डाव) : ४८.५ षटकांत ५ बाद २३८ डाव घोषित (हार्दिक तामोरे ११३, शाम्स मुलानी ७०; मिहिर हिरवानी ४/७१)

’मध्य प्रदेश (दुसरा डाव) : २३ षटकांत २ बाद ४४ (रमीझ खान खेळत आहे २७, अजय रोहेरा ८; अंकुश जैस्वाल १/१)