रणजी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाची सुरुवात अतिशय खराब झालेली आहे. सेनादलाविरुद्ध सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव अवघ्या ४४ धावांवर संपुष्टात आला. सत्यजित बच्छाव आणि चिराग खुराना या फलंदाजांचा अपवाद वगळता एकही फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकला नाही.

नाणेफेक जिंकत महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय अत्यंत चुकीचा सिद्ध झाला. मुर्तझा ट्रंकवाला पहिल्याच षटकात माघारी परतल्यामुळे महाराष्ट्राला पहिला धक्का बसला. यानंतर डावाला लागलेली गळती महाराष्ट्राचे फलंदाज थांबवूच शकले नाहीत. पुनम पुनिया, सचिदानंद पांडे आणि दिवेश पठानिया या गोलंदाजांनी महाराष्ट्राच्या डावाला खिंडार पाडलं. पुनियाने ५, पांडेने ३ तर पठानियाने २ बळी घेतले.

महाराष्ट्राकडून बच्छावने ११ तर चिराग खुरानाने १४ धावा केल्या. सेनादलाचीही पहिल्या डावात खराब सुरुवात झाली. ३६ धावांत सेनादलाचे ३ फलंदाज माघारी माघारी परतले, मात्र यानंतर इतर फलंदाजांनी नेटाने सामना करत संघाचा डाव सावरला. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्राची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही, त्यामुळे या सामन्यात महाराष्ट्राचा संघ कसा पुनरागमन करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.