अखेरच्या दिवशी उत्तराखंडला विजयासाठी १६७ धावांची आवश्यकता

बारामती : कर्णधार अंकित बावणे (६१ धावा), अष्टपैलू सत्यजित बच्छाव (६७) आणि स्वप्निल फुलपगार (५१) या त्रिकुटाने झळकावलेल्या अर्धशतकांनंतरही रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उत्तराखंडविरुद्धच्या ‘क’ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात महाराष्ट्रावर पराभवाचे सावट निर्माण झाले आहे. महाराष्ट्राने दिलेल्या २७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर उत्तराखंडने २ बाद १०३ धावांपर्यंत मजल मारली असून अखेरच्या दिवशी त्यांना विजयासाठी अवघ्या १६७ धावांची आवश्यकता आहे.

बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात गुरुवारच्या २ बाद १४० धावांवरून पुढे खेळताना महाराष्ट्राच्या अंकित आणि स्वप्निल यांनी तिसऱ्या गडय़ासाठी १११ धावांची भागीदारी रचली. परंतु ३२ वर्षीय मध्यमगती गोलंदाज सन्नी राणाचे गोलंदाजीसाठी आगमन होताच महाराष्ट्राची फलंदाजी ढेपाळली. ४३ धावांत सात बळी घेणाऱ्याराणाने यजमानांची ३ बाद १६२ धावांवरून ९ बाद २५७ धावा अशी अवस्था केली. परंतु सत्यजितने झुंजार अर्धशतक साकारून अखेरच्या गडय़ासाठी प्रदीप दाढेसह ५६ धावांची भागीदारी रचली. राणानेच सत्यजितला बाद करून महाराष्ट्राचा दुसरा डाव ३१३ धावांत गुंडाळला.

त्यानंतर उत्तराखंडने लक्ष्याचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली असून तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावातील शतकवीर कमल सिंग ४०, तर मयांक मिश्रा १८ धावांवर खेळत आहेत. त्यामुळे शनिवारी उतराखंडच्या उर्वरित

आठ फलंदाजांना महाराष्ट्राचे गोलंदाज १६७ धावांच्या आत बाद करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संक्षिप्त धावफलक

’  महाराष्ट्र (पहिला डाव) : २०७

’  उत्तराखंड (पहिला डाव) : २५१

’  महाराष्ट्र (दुसरा डाव) : १०२.३ षटकांत सर्व बाद ३१३ (सत्यजित बच्छाव ६७, अंकित बावणे ६१; सन्नी राणा ७/४३)

’  उत्तराखंड (दुसरा डाव) : ३३ षटकांत २ बाद १०३ (कमल सिंग खेळत आहे ४०, दीक्षांशू नेगी ३८; प्रदीप दाढे १/४)