२०१९-२० हंगामातला आपला पहिला रणजी सामना खेळणाऱ्या मुंबईने धडाकेबाज सुरुवात केली आहे. बडोद्यावर ३०९ धावांनी मात करत मुंबईने या हंगामातला पहिला विजय नोंदवला आहे. विजयासाठी ५३४ धावांचं आव्हान बडोद्याला झेपलं नाही. बडोद्याचा दुसरा डाव २२४ धावांत आटोपला. या सामन्यात मुंबईकडून शम्स मुलानीने अष्टपैलू खेळ केला.

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबईने फलंदाजांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर ४३१ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल बडोद्याने ३०७ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकडून शम्स मुलानीने ६ बळी घेत बडोद्याच्या डावाला खिंडार पाडलं. बडोद्याकडून केदार देवधरने नाबाद १६० धावा केल्या. दुसऱ्या डावातही मुंबईने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखत भक्कम आघाडी घेतली. पृथ्वी शॉने द्विशतक आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी १६० धावा केल्या.

५३४ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बडोद्याची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस बडोद्याचे ३ गडी माघारी परतले होते. अखेरच्या दिवशी बडोद्याकडून अभिमन्यूसिंह राजपूत आणि दीपक हुडा यांनी अर्धशतकी खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी आपला भेदक मारा सुरु ठेवत बडोद्याची झुंज मोडून काढली. शम्स मुलानीने दुसऱ्या डावात ४ तर शशांक अत्राडे-अक्ष पारकरने प्रत्येकी २-२ बळी घेतले. तुषार देशपांडेने १ बळी घेतला. सामन्यात १० बळी आणि ८९ धावा करणाऱ्या शम्स मुलानीला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.