23 February 2020

News Flash

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबईची आघाडीच्या दिशेने वाटचाल

मध्य प्रदेश २२७ धावांनी पिछाडीवर; सर्फराजचे द्विशतक हुकले

मध्य प्रदेश २२७ धावांनी पिछाडीवर; सर्फराजचे द्विशतक हुकले

मुंबई : डावखुरा फलंदाज व्यंकटेश अय्यरने (खेळत आहे ८७) दिलेल्या कडव्या झुंजीनंतरही मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ब-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या दिशेने कूच केली आहे. त्यापूर्वी मुंबईच्या सर्फराज खानला (१७७) हंगामातील दुसऱ्या द्विशतकाने हुलकावणी दिली.

वानखेडे स्टेडियमवरील या सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर मध्य प्रदेशने ७ बाद २०० धावा केल्या असून ते अद्यापही २२७ धावांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे शुक्रवारी व्यंकटेश तळाच्या फलंदाजांना साथीला घेत मुंबईला पहिल्या डावात आघाडी घेण्यापासून रोखणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दोन्ही संघांचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले असले तरी, सर्फराजचे द्विशतक पाहण्यासाठी गुरुवारी काही चाहत्यांनी स्टेडियम गाठले. बुधवारच्या ४ बाद ३५२ धावांवरून पुढे खेळताना सर्फराजला द्विशतकासाठी ३१ धावांची आवश्यकता होती. परंतु दिवसाच्या तिसऱ्याच षटकात गौरव यादवच्या गोलंदाजीवर त्याच्याकडेच झेल देत सर्फराज माघारी परतला. त्याने २१० चेंडूंत २४ चौकार व ३ षटकारांसह १७७ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने पदार्पणवीर आकर्षित गोमेलच्या (१२२) साथीने पाचव्या गडय़ासाठी २७२ धावांची भागीदारीही रचली. ५ बाद ३६१ धावसंख्येवर सर्फराज बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव घसरला. मध्य प्रदेशचा कर्णधार शुभम शर्माने रॉयस्टन डायसचा (१) त्रिफळा उडवून मुंबईचा पहिला डाव ४२७ धावांत गुंडाळला.

प्रत्युत्तरात रॉयस्टन-दीपक शेट्टीची वेगवान जोडी आणि फिरकीपटू शाम्स मुलानीने ठरावीक अंतराने मध्य प्रदेशला हादरे देत एकवेळ त्यांची ५ बाद ७२ धावा अशी अवस्था केली. मात्र सातव्या स्थानावर आलेल्या व्यंकटेशने एक बाजू सांभाळून धरत मध्य प्रदेशला तीन आकडी धावंसख्या गाठून दिली. त्याने शुभमसह (१८) सहाव्या गडय़ासाठी ६२ धावांची भागीदारी रचली. मिहीर हिरवानीसह (२१) सातव्या गडय़ासाठी ६५ धावांची भर घालून त्याने मध्य प्रदेशला २०० धावांपर्यंत नेले. व्यंकटेशने ११ चौकार आणि २ षटकारांसह ८७ धावा केल्या असून दिवसअखेर रवी यादव (०) त्याची साथ देत आहे. मुंबईतर्फे रॉयस्टन, दीपक आणि मुलानी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले आहेत.

संक्षिप्त धावफलक

’  मुंबई (पहिला डाव) : १०८.३ षटकांत सर्व बाद ४२७ (सर्फराज खान १७७, आकर्षित गोमेल १२२; गौरव यादव ४/१०१)

’  मध्य प्रदेश (पहिला डाव) : ५८ षटकांत ७ बाद २०० (व्यंकटेश अय्यर खेळत आहे ८७, यश दुबे २५; रॉयस्टन डायस २/३८, शम्स मुलानी २/४३)

आघाडीच्या फलंदाजांनी अधिक जबाबदारीने फलंदाजी करणे आवश्यक होते. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांना पोषक असून सीमारेषाही फारशी लांब नसल्याने मी आक्रमक खेळावर भर दिला. शुक्रवार सकाळचा एक तास आमच्यासाठी फार महत्त्वाचा असून स्वत:च्या शतकापेक्षा संघाला फॉलोऑनच्या छायेतून वाचवण्याचे माझे मुख्य ध्येय आहे.

– व्यंकटेश अय्यर,  मध्य प्रदेशचा फलंदाज

First Published on February 14, 2020 12:06 am

Web Title: ranji trophy 2019 20 mumbai take lead against madhya pradesh zws 70
Next Stories
1 आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा : युवा मलेशियाकडून भारताची हार
2 प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितची विजयी सलामी
3 राष्ट्रीय खेळाचा दर्जा कुणालाही नाही!
Just Now!
X