कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात शॉ, रहाणे पुन्हा अपयशी

मुंबई : भारताचा कसोटी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि उदयोन्मुख सलामीवीर पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी ठरले. त्यामुळे कर्नाटकच्या वेगवान गोलंदाजांनी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ब-गटातील लढतीत मंबईचा डाव १९४ धावांत गुंडाळला. कर्णधार सूर्यकुमार यादवने (७७) एकाकी झुंज दिली.

वांद्रे-कुर्ला संकुल येथील शरद पवार इनडोअर स्टेडियमवर चालू असलेल्या या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांची तारांबळ उडाली. सूर्यकुमारने ९४ चेंडूंत १० चौकार आणि दोन षटकारांसह अप्रतिम खेळी साकारत मुंबईला किमान दोनशे धावसंख्येच्या जवळपास नेले. उत्तरार्धात कर्नाटकचीसुद्धा ३ बाद ७९ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे कर्नाटकचा संघ अद्याप ११५ धावांनी पिछाडीवर आहे.

चार वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यासह खेळणाऱ्या कर्णधार करुण नायरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय सार्थकी ठरला. कारण पहिल्या सत्राअखेर मुंबईची ६ बाद ८६ अशी अवस्था झाली होती. मध्यमगती गोलदांज व्ही. कौशिकने (३/४५) सलामीवीर आदित्य तरेला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर पृथ्वीच्या साथीला रहाणे मैदानावर आल्यावर मुंबईचा डाव ही जोडी सावरेल अशी अपेक्षा होती. परंतु मिळालेल्या एका जीवदानाचे सोने करता न आलेला रहाणे ७ धावांवर तंबूत परतला. वेगवान गोलंदाज रोनित मोरेने (२/४७) त्याला बाद केले. यष्टिरक्षक बी. आर. शरदने त्याचा अप्रतिम झेल टिपला. मग तीनच चेंडूंच्या अंतराने मोरेने भरवशाचा फलंदाज सिद्धेश लाडचा त्रिफळा उडवला.

पृथ्वीने संयमी खेळ करीत ५७ चेंडूंत सहा चौकारांसह २९ धावा केल्या. परंतु मुंबईचा डाव सारणारी मोठी खेळी साकारण्यात तो अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुनने (२/४८) त्याचा त्रिफळा उडवला. डावखुरा वेगवान गोलंदाज प्रतीक जैनने (२/२०) नंतर सर्फराज खान (८) आणि शाम्स मुलानी (०) यांचे अडसर दूर केले. त्यामुळे मुंबईची ६ बाद ६० अशी अवस्था झाली. परंतु सूर्यकुमारने शशांक अत्तार्डेच्या (५१ चेंडूंत सहा चौकारांसह ३५ धावा) साथीने सातव्या गडय़ासाठी ९२ चेंडूंत ८८ धावांची भागीदारी करीत मुंबईचा डाव सावरला. सूर्यकुमारने श्रेयस गोपाळच्या २८व्या षटकात १९ धावा केल्या. ही जोडी फोडण्यात कौशिकला यश आले. रेड्डीने अत्तार्डेचा पहिल्या स्लिपमध्ये अप्रतिम झेल टिपला. सूर्यकुमारचा अडसर मग मिथुनने दूर केला. गोपाळने दीपक शेट्टीचा त्रिफळा उडवून मुंबईच्या डावावर ५५.५ षटकांत पूर्णविराम दिला.

प्रत्युत्तरादाखल, सलामीवीर देवदत्त पडिक्कल (३२) आणि आर. समर्थ (नाबाद ४०) यांनी कर्नाटकला ६८ धावांची दमदार सलामी करून दिली. मुंबईचा डावखुरा फिरकी गोलंदाज शाम्स मुलानीने पडिक्कल आणि अभिषेक रेड्डी (०) यांना एकाच षटकात बाद करून कर्नाटकची अवस्था २ बाद ६८ अशी केली. मग अत्तार्डेने रोहन कदमला (४) बाद केले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ५५.५ षटकांत सर्व बाद १९४ (सूर्यकुमार यादव ७७, शशांक अत्तार्डे ३५; व्ही. कौशिक ३/४५, प्रतीक जैन २/२०)

कर्नाटक (पहिला डाव) : २४ षटकांत ३ बाद ७९ (आर. समर्थ खेळत आहे ४०; शाम्स मुलानी २/२०)

खांद्याच्या दुखापतीमुळे पृथ्वीने मैदान सोडले

मुंबई : भारत ‘अ’ संघासह न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यासाठी आठवडा बाकी असतानाच सलामीवीर पृथ्वी शॉ याला कर्नाटकविरुद्धच्या रणजी सामन्यात डाव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे शुक्रवारी मैदान सोडावे लागले. ओव्हरथ्रो चेंडू पकडण्यासाठी सूर मारणाऱ्या पृथ्वीच्या खांद्याला तिसऱ्या सत्रात ही दुखापत झाली. त्यामुळे त्याला त्वरित मैदान सोडावे लागले. पृथ्वी १० जानेवारीपासून न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून, तिथे तो मर्यादित षटकांचे आणि चारदिवसीय सामने खेळणार आहे. ‘‘पृथ्वीच्या दुखापतीसंदर्भात फिजिओच काही तासांनंतर नक्की सांगू शकेल. तो खेळेल अशी मला आशा आहे,’’ असे सूर्यकुमारने सांगितले.