कमालच्या शतकामुळे उत्तराखंडला पहिल्या डावात निर्णायक आघाडी

बारामती : सलामीवीर कमाल सिंगने (१०१ धावा) साकारलेल्या अप्रतिम शतकाच्या बळावर उत्तराखंडने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘क’ गटातील अखेरच्या साखळी सामन्याच्या पहिल्या डावात महाराष्ट्रावर ४४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. त्यामुळे महाराष्ट्राच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीतील दुसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात २ बाद १४० धावा केल्या असून त्यांनी ९६ धावांची आघाडी मिळवली आहे. परंतु पहिल्या डावात आघाडी घेण्यात अपयशी ठरल्यामुळे महाराष्ट्राला आता सामना जिंकण्याशिवाय पर्याय नसून सेनादल विरुद्ध छत्तीसगड या सामन्यातील निकालावरसुद्धा त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

बुधवारच्या ३ बाद ११२ धावांवरून पुढे खेळताना कमाल आणि सौरभ रावत यांनी चौथ्या गडय़ासाठी ७५ धावांची भागीदारी रचली. सौरभ बाद झाल्यानंतर फिरकीपटू सत्यजीत बच्छावपुढे (४/७१) उत्तराखंडचा डाव घसरला. मात्र कमालने एक बाजू सांभाळून १७ चौकारांसह शतकी खेळी साकारल्याने उत्तराखंडने पहिल्या डावात २५१ धावांपर्यंत मजल मारली.

दुसऱ्या डावात महाराष्ट्राच्या स्वप्निल गुगळे (२३) आणि ऋतुराज गायकवाड (२७) यांना चांगल्या सुरुवातीला लाभ उचलता आला नाही. परंतु कर्णधार अंकित बावणे (खेळत आहे ५०) आणि स्वप्निल फुलपगार (खेळत आहे ४०) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ८९ धावांची भागीदारी रचून महाराष्ट्राच्या विजयाचा आशा कायम राखल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र (पहिला डाव) : २०७

उत्तराखंड (पहिला डाव) : ७९.५ षटकांत सर्व बाद २५१ (कमाल सिंग १०१, सौरभ रावत ४९; सत्यजीत बच्छाव ४/७१)

महाराष्ट्र (दुसरा डाव) : ४६ षटकांत २ बाद १४० (अंकित बावणे खेळत आहे ५०, स्वप्निल फुलपगार खेळत आहे ४०; सन्नी राणा २/१४)