25 September 2020

News Flash

विदर्भाच्या फिरकीत सौराष्ट्र अडकला

विदर्भ ३१२ धावसंख्येपुढे सौराष्ट्रचा निम्मा संघ १५८ धावांत गारद

अक्षय कर्णेवारचे दमदार अर्धशतक; विदर्भ ३१२ धावसंख्येपुढे सौराष्ट्रचा निम्मा संघ १५८ धावांत गारद

नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गाजवणारा सौराष्ट्रचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला केवळ एका धावावर माघारी पाठवून विदर्भाने जेतेपदाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर केला. मात्र यष्टीरक्षक स्नेल पटेलने शानदार अर्धशतक ठोकून सौराष्ट्रला सावरले. विदर्भाच्या फिरकीपटूंनी सौराष्ट्रचा निम्मा संघ आपल्या जाळ्यात अडकवला आणि लढतीवरील पकड मजबूत केली. गतविजेत्या विदर्भाने रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रचा निम्मा संघ १५८ धावांत तंबूत धाडला.

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मदानावर सुरू असलेल्या सामन्यात विदर्भाने ७ बाद २०० धावांवरून डावाला पुढे प्रारंभ केला. मात्र दुसऱ्या दिवशी उपाहारापूर्वीच त्यांचा पहिला डाव ३१२ धावांवर संपुष्टात आला. अखेरच्या तीन फलंदाजांनी तब्बल ११२ धावा काढून विदर्भाला तीनशे धावांचा पल्ला गाठून दिला. अक्षय कर्णेवारने आठ चौकार आणि दोन षटकारांसह १६० चेंडूंत आपले शानदार दुसरे अर्धशतक पूर्ण केले, तर दुसऱ्या बाजूने खेळणारा अक्षय वाखरेने कर्णेवारला चांगली साथ दिली. या दोघांनी ७८ धावांची भागीदारी केली. अक्षय वाखरेने तीन चौकारांसह ३४ धावांचे योगदान दिले. सौराष्ट्रकडून कर्णधार जयदेव उनाडकटने तीन तर चेतन सकारियाने दोन गडी बाद केले.

मग सौराष्ट्रची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार फैज फजलने अगदी तिसऱ्याच षटकात फिरकीपटूंवर विश्वास दर्शवत आदित्य सरवटेकडे चेंडू दिला. त्याने आपल्या पहिल्याच षटकात सलामीवीर हार्वीक देसाईला (१०) पायचित केले आणि सौराष्ट्रला पहिला झटका दिला. त्यानंतर मात्र सलामीवीर स्नेल पटेल आणि विश्वराज जडेजाने संयमी खेळी साकारत सौराष्ट्रचा धावफलक हलता ठेवला. दोघांनी सौराष्ट्रला ७९ धावांपर्यंत पोहोचवले. मात्र त्यानंतर जडेजाला आदित्यने पायचीत केले, तर दुसऱ्या बाजूने पटेलने सावध फलंदाजी करत अर्धशतकाकडे कूच केली.

चौथ्या स्थानी आलेल्या अनुभवी चेतेश्वर पुजाराला सरवटेने केवळ एका धावेवर झेलबाद केले. पुजाराने उपांत्य लढतीत कर्नाटकविरुद्ध शानदार १४१ धावा काढून संघाला संकटातून बाहेर काढले आणि अंतिम फेरीत पोहोचवले होते. त्यानंतर वाखरेने शेल्डन जॅक्सन व अíपत वासवडाला बाद करून सौराष्ट्रला चांगले अडचणीत आणले. स्नेल पटेलने १६० चेंडूंत १४ चौकारांच्या मदतीने नाबाद ८७ धावा करून संघाला बळ दिले.  तीन बळी घेणाऱ्या सरवटेने यंदाच्या हंगामात एकूण ४७ बळी घेतले आहेत, तर वाखरेने २ गडी बाद केले. सलामीवीर स्नेल पटेल (८७) आणि प्रेरक मंकड (१६) धावांवर खेळपट्टीवर कायम आहेत.

संक्षिप्त धावफलक

  • विदर्भ (पहिला डाव) : १२०.२ षटकांत सर्व बाद ३१२ (अक्षय कर्णेवार नाबाद ७३; जयदेव उनाडकट ३/५४, कमलेश मकवाना २/५७)
  • सौराष्ट्र (पहिला डाव) : ५९ षटकांत ५ बाद १५८ (स्नेल पटेल नाबाद ८७; आदित्य सरवटे ३/५५, अक्षय वाखरे २/४२).

पुजाराचा बळी ही माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात चांगली कामगिरी ठरली आहे. त्याला झटपट बाद करता यावे, यासाठी आम्ही ऑस्ट्रेलिय दौऱ्यावर असलेल्या पुजाराची फलंदाजी टीव्हीवर बघून, तशी क्षेत्ररक्षणाची रणनीती आखली आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. विदर्भाच्या धावसंख्येत अक्षय कर्णेवार, वाखरेने चांगली फलंदाजी करून मोलाचे योगदान दिले.   – आदित्य सरवटे, विदर्भाचा गोलंदाज

संथ गतीच्या खेळपट्टीवर फलंदाजी करण्याचा माझा जुना अनुभव आहे. अशा प्रकारच्या खेळपट्टीमध्ये फलंदाजांना अधिक वेळ मिळतो. चहापानाच्या पूर्वी विदर्भाने आक्रमक गोलंदाजी केली. त्यांचा अधिक भर पुजाराला बाद करण्यावर होता. काही षटकांत मी स्थिरावल्याने चांगली फलंदाजी करू शकलो. मंगळवारी मोठी भागीदारी करण्यावर भर असेल.    – स्नेल पटेल, सौराष्ट्राचा फलंदाज

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 2:04 am

Web Title: ranji trophy 2019 3
Next Stories
1 भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या स्थानावरच!
2 महाराष्ट्र रिंगणाबाहेर!
3 ‘खेलो इंडिया’मधील प्रयोग महिला कबड्डीसाठी दिशादर्शक!
Just Now!
X