यंदा रणजी करंडक क्रिकेट तीन दिवसांपूर्वीच सुरू झाली. सध्या ही स्पर्धा बऱ्याच गोष्टींमुळे गाजताना दिसते आहे. पण यामध्ये कामगिरीचा भाग तसा कमीच. अन्य विषयांवरच चर्चा झडताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ही स्पर्धा सुरू होते न होते तोच त्यावर रद्द करण्याची टांगती तलवार आली होती. लोढा समितीने बीसीसीआयला संलग्न संघटनांचा निधी रोखण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन धोक्यात आले होते. पण त्यापूर्वीही जेव्हा या स्पर्धेचे आयोजन करताना सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याच्या निर्णयाने वाद निर्माण झाला होता.

यापूर्वी रणजी स्पर्धेतील काही सामने संघांना आपल्या घरच्या मैदानात तर कधी प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानात खेळावे लागत होते. या वेळी यजमान संघाला घरच्या वातावरणाचा, खेळपट्टीचा फायदा मिळत होता. जवळपास सर्वच संघ आपल्या क्षमतेनुसार खेळपट्टी बनवून घेत होते. त्यावर कुठे तरी अंकुश बसावा म्हणून बीसीसीआयने त्रयस्थ ठिकाणी सामने खेळवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर बऱ्याच जणांनी नाकं मुरडली होती, पण सांगणार कुणाला हादेखील प्रश्न होताच. यावर बऱ्याच प्रशिक्षकांनी एक मार्ग दाखवला होता. रणजी सामन्यात नाणेफेकीचा कौल घ्यायचाच नाही, तर जो पाहुणा संघ आहे त्याने प्रथम फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घ्यायचा. हा मार्ग स्तुत्य होता. कारण यजमान संघाला खेळपट्टीचा फायदा कमी मिळणार होता. त्यामुळे यजमानांनी खेळपट्टी कशी बनवावी, या गोष्टीमध्ये रस घेतला नसता आणि स्पर्धाही निकोप होऊ शकली असती. पण बीसीसीआयमध्ये बसणाऱ्या आणि स्वत:ला माजी क्रिकेटपटू म्हणवणाऱ्या धुरीणांना ते पटले नाही. त्यांनी त्रयस्थ ठिकाणीच सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सर्वात मोठी समस्या अशी की, सध्याच्या घडीला रणजी स्पर्धेकडे चाहत्यांनी पाठ फिरवल्याचेच चित्र दिसते. याचे कारण म्हणजे दर्दी चाहत्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. त्याचबरोबर आयपीएलसारखे फास्ट-फूडसारखे क्रिकेट त्यांना आपलेसे वाटू लागले आहे. पण जर सामना त्रयस्थ ठिकाणी असेल तर तिथे सामना पाहायला प्रेक्षक येणार का? या गोष्टीचा विचार बीसीसीआयने केला नाही. भारताकडून खेळणारे फारच कमी क्रिकेटपटू रणजी स्पर्धेत खेळतात. त्यामुळे त्यांना बघायला प्रेक्षक येतील, हीदेखील शक्यता कमीच. सध्या कसोटी क्रिकेटची अवस्था साऱ्यांनाच माहिती आहे. त्या धर्तीवर रणजी स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत कशी अधिक पोहोचता येईल, याचा विचार बीसीसीआयने करायला हवा होता. पण ते जेवढा विचार सोन्याची खाण असलेल्या आयपीएलचा करतात तेवढा रणजी स्पर्धेचा करत नाही, हे स्पष्ट आहे.

रणजीचे आयोजन करताना या स्पर्धेत गुलाबी चेंडूचा वापर करण्यात यावा, असाही प्रस्ताव ठेवण्यात आला होता. बीसीसीआयने हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले. पण त्यावर कोणताच विचार केला नाही. नाही तर या मोसमात २८ संघांतील जवळपास ७०० खेळाडूंना हा नवीन अनुभव घेता आला असता.

सध्या बीसीसीआय लोढा समितीच्या शिफारशींमध्ये गुरफटली आहे. त्याची अंमलबजावणी करायची की नाही, याबाबत त्यांची चालढकल सुरू आहे. बीसीसीआयने संलग्न संस्थांना दिलेल्या निधीचा व्यवहार लोढा समितीला अमान्य आहे. जर हा निर्णय रद्द करण्यात आला तर ही स्पर्धा भरवायची कशी, हा प्रश्न बीसीसीआयपुढे असेल. काही संघटनांना निधीची गरज नाही, पण ज्यांच्याकडे निधी नाही ते रणजी स्पर्धा कशी भरवतील, हा मोठा प्रश्न असेल.खेळ आणि खेळाडूंचा विकास, हे बीसीसीआयचे प्राथमिक ध्येय असायला हवे. काही वर्षांपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनने कांगा लीग स्पर्धेच्या तारख्या बदलल्या होत्या. त्यामुळे ही स्पर्धा मरणासन्न अवस्थेत गेली होती. रणजी स्पर्धेला चांगला इतिहास आहे. तो आधी बीसीसीआयने जाणून घ्यायला हवा. या स्पर्धेचे महत्त्व त्यांनी समजून घ्यायला हवे आणि प्राथमिकता या स्पर्धेच्या आयोजनाला द्यायला हवी. काही प्रयोग करता येऊ शकतात, पण त्या प्रयोगांचा स्पर्धा, खेळ, खेळाडू यांच्यावर किती परिणाम होईल याचा त्यांनी सखोल विचार करायला हवा. नाही तर रणजी स्पर्धेचे अवशेष पुढच्या पिढीला पाहायला मिळतील.

 

– प्रसाद लाड

prasad.lad@expressindia.com