ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खराब फॉर्ममुळे शेवटच्या कसोटीत संघातील स्थान गमावलेल्या चेतेश्वर पुजाराने रणजी क्रिकेट स्पर्धेत चिवट शतकासह दमदार पुनरागमन केले. पुजाराच्या शतकामुळेच सौराष्ट्रने विदर्भच्या ५८३ धावांच्या डोंगरासमोर खेळताना ५ बाद २५१ अशी मजल मारली आहे.
२ बाद २० अशा नाजूक स्थितीतून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या सौराष्ट्रच्या डावाला सागर जोगियानी आणि चेतेश्वर पुजारा यांनी आकार दिला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १८५ धावांची भागीदारी करत सौराष्ट्रचा डाव सावरला. शतकाकडे कूच करणाऱ्या जोगियानीला अक्षय वाखरेने बाद केले. त्याने ११ चौकार आणि एका षटकारासह ८१ धावांची खेळी केली. यानंतर एकामागोमाग एक खेळाडू बाद होत असतानाही पुजाराने संयमी खेळ करत शतक साकारले. मागच्या लढतीत शतकी खेळी साकारणाऱ्या शेल्डॉन जॅक्सनने १६ धावा केल्या. वाखरेनेच पुजाराला पायचीत केले. त्याने १५ चौकार आणि एका षटकारासह ११४ धावांची खेळी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा जयदेव शाह १२ तर अर्पित वसावडा १३ धावांवर खेळत आहे. सौराष्ट्रचा संघ अजूनही ३३२ धावांनी पिछाडीवर आहे.