शिवम दुबेची अष्टपैलू चमक, सिद्धेशला शतकाची हुलकावणी; तुषारची भेदक गोलंदाजी

युवा डावखुरा फलंदाज शिवम दुबेने साकारलेले धडाकेबाज शतक आणि त्यानंतर तुषार देशपांडेच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत रेल्वेविरुद्धच्या ‘अ’ गटातील साखळी लढतीत भक्कम आघाडीच्या दिशेने वाटचाल केली आहे. पहिल्या डावात मुंबईने ४११ धावांचा डोंगर उभारल्यानंतर रेल्वेची दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ११५ धावा अशी बिकट अवस्था झाली आहे. मुंबईकर सिद्धेश लाडला मात्र शतकाने अवघ्या एका धावेने हुलकावणी दिली.

गुरुवारच्या ५ बाद २७८ धावांवरून पुढे खेळताना मुंबईने सावध सुरुवात केली. सिद्धेशने दिवसाच्या चौथ्या षटकात दोन चौकार ठोकून नव्वदीच्या घरात प्रवेश केला. मात्र ९९ धावांवर असताना अविनाश यादवने त्याचा त्रिफळा उडवला. १४ चौकारांसह सिद्धेशने तब्बल १८९ चेंडू किल्ला लढवला. सिद्धेश व शिवम यांनी सहाव्या गडय़ासाठी ७९ धावांची बहुमूल्य भागीदारी रचली.

सिद्धेश बाद झाल्यानंतरही शिवमने न डगमगता फलंदाजी केली. त्याने प्रथम श्रेणी कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावताना १३ चौकार व ४ षटकार ठोकले. कर्णधार धवल कुलकर्णीसह शिवमने सातव्या गडय़ासाठी ५६ धावांची भागीदारी रचली. हर्ष त्यागीने शिवमला ११४ धावांवर बाद करत मुंबईचा डाव ११५.२ षटकांत संपवला.

पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या रेल्वेची सुरुवात खराब झाली. अवघ्या २ धावांवर तुषारने नितीन भल्लेला, तर धवल कुलकर्णीने प्रथम सिंगला ४ धावांवर त्रिफळाचीत करत रेल्वेची अवस्था २ बाद १६ अशी केली. त्यानंतर अरिंदम घोषने नाबाद ३९ धावा करत एक बाजू लावून धरली. कर्णधार महेश रावतने ३० धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे दिवसअखेर रेल्वेचा संघ अडचणीत सापडला असून ते मुंबईपेक्षा अद्याप २९६ धावांनी पिछाडीवर आहेत. तुषारने तीन, तर शिवम, धवलने प्रत्येकी एक बळी मिळवला. त्यामुळे रेल्वेला झटपट गुंडाळून फॉलोऑन लादण्याची संधी मुंबईकडे आहे.

विदर्भावर फॉलोऑनची नामुष्की

नागपूर : फलंदाजी हेच बलस्थान असतानाही गतविजेत्या विदर्भच्या फलंदाजांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली. त्यामुळे विदर्भावर दुसऱ्याच दिवशी फॉलोऑनची नामुष्की ओढवली. राहुल त्रिपाठीच्या ७३ धावांच्या योगदानामुळे महाराष्ट्राने पहिल्या डावात सर्वबाद ३४३ धावा केल्या. महाराष्ट्राच्या ३४३ धावांचा पाठलाग करताना विदर्भचा पहिला डाव अवघ्या १२० धावांवर आटोपला. २२३ धावांनी पिछाडीवर पडलेल्या विदर्भाने दुसऱ्या डावात दिवसअखेर बिनबाद ४६ अशी मजल मारली आहे. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी करंडकातील पहिल्याच सामन्यात राहुल त्रिपाठीने दुसरा दिवस गाजवला. राहुलने ७१ चेंडूंत १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ११५.२ षटकांत सर्वबाद ४११ (शिवम दुबे ११४, सिद्धेश लाड ९९; हर्ष त्यागी ४/२३) वि. रेल्वे (पहिला डाव) : ४५ षटकांत ६ बाद ११५ (अरिंदम घोष खेळत आहे ३९; तुषार देशपांडे ३/२९, शिवम दुबे १/१६).