बडोद्याविरुद्ध पहिल्या दिवशी मुंबईची ८ बाद ३६२ अशी धावसंख्या

भारतीय संघातील कसोटी विशेषज्ञ फलंदाज अजिंक्य रहाणे, युवा सलामीवीर पृथ्वी शॉ यांच्यासह चौघांच्या अर्धशतकांच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या पहिल्या दिवशी बडोद्याविरुद्ध ८ बाद ३६२ अशी दमदार मजल मारली.

भारताच्या कसोटी संघातील सलामीवीराच्या स्थानासाठी दावेदारी करणाऱ्या पृथ्वीने ६२ चेंडूंत ६६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. यात ११ चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. वेगवान गोलंदाज अभिमन्यू रजपूतने पृथ्वीला बाद केले. त्याने सलामीवीर जय बिश्ताच्या (१८) साथीने पहिल्या गडय़ासाठी ७४ धावांची भागीदारी केली. बिश्ता बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शुभम रांजणेने ५९ चेंडूंत ३६ धावा केल्या. परंतु तो मोठी खेळी उभारण्यात अपयशी ठरला.  रहाणेने रांजणेच्या साथीने तिसऱ्या गडय़ासाठी ५७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर बडोद्याच्या गोलंदाजांनी राजणे, कर्णधार सूर्यकुमार यादव (०) आणि आदित्य तरे यांना बाद केल्यामुळे मुंबईची ५ बाद १८२ अशी अवस्था झाली. परंतु रहाणेने एक बाजू सावरत संयमी फलंदाजी केली. त्याने १४५ चेंडूंत १० चौकारांसह ७९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी उभारली.

रहाणे बाद झाल्यावर शाम्स मुलानी आणि शार्दूल ठाकूर यांनी आठव्या गडय़ासाठी १०८ धावांची भागीदारी करीत मुंबईचा डाव सावरला. शार्दूलने ६३ चेंडूंत ११ चौकार आणि एक षटकारासह ६४ धावा केल्या, तर मुलानी ५६ धावांवर खेळत आहे. यात सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. बडोद्याकडून भार्गव भटने ११० धावांत ३ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : ९० षटकांत ८ बाद ३६२ (अजिंक्य रहाणे ७९, पृथ्वी शॉ ६६, शार्दूल ठाकूर ६४, शाम्स मुलानी खेळत आहे ५६; भार्गव भट ३/११०)