पहिल्या डावात ४ बाद ८८ अशी अवस्था; हरियाणाची आघाडीच्या दिशेने वाटचाल

डावखुरा फिरकी गोलंदाज टिनू कुंडूने केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर हरियाणाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ‘क’ गटातील सलामीच्या सामन्यात महाराष्ट्राची ४ बाद ८८ धावा अशी अवस्था केली आहे. दुसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्र अद्याप ३१३ धावांनी पिछाडीवर असल्यामुळे हरियाणाने आघाडीच्या दिशेने वाटचाल केली आहे.

चौधरी लाल क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात सोमवारच्या ३ बाद २७९ धावांवरून पुढे खेळताना शतकवीर शुभम रोहिलाने १४२ धावांची खेळी साकारून हरियाणाला ४०० धावांचा पल्ला गाठून देण्यात मोलाची भूमिका बजावली. महाराष्ट्राच्या अनुपम संकलेचाने शुभमसह आणखी तीन फलंदाजांना माघारी पाठवल्यामुळे हरियाणाचा डाव ४०१ धावांवर संपुष्टात आला. सत्यजीत बच्छावनेही तीन बळी मिळवले.

प्रत्युत्तरात सलामीवीर ऋतुराज गायकवाड (७), स्वप्निल गुगळे (२१), राहुल त्रिपाठी (८) आणि चिराग खुराना (१८) यांनी एकामागोमाग एक रांग लावल्यामुळे महाराष्ट्राचा संघ अडचणीत सापडला आहे. दिवसअखेर कर्णधार नौशाद शेख २३, सत्यजीत पाच धावांवर खेळत आहेत.

संक्षिप्त धावफलक

हरियाणा (पहिला डाव) : १२४.२ षटकांत सर्व बाद ४०१ (शुभम रोहिला १४२, शुभम चौहान ११७; अनुपम संकलेचा ४/८३)

महाराष्ट्र (पहिला डाव) : ४४ षटकांत ४ बाद ८८ (नौशाद शेख खेळत आहे २३, स्वप्निल गुगळे २१; टिनू कुंडू २/२१)