मुंबई पहिल्या डावात आघाडी घेण्याची चिन्हे; केदार देवधरचे नाबाद शतक

शाम्स मुलानीच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील बडोद्याविरुद्धच्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी आपली पकड घट्ट केली आहे. मुंबईचा संघ पहिल्या डावात आघाडी घेण्याची चिन्हे आहेत. ते टाळण्यासाठी नाबाद शतक साकारणारा सलामीवीर केदार देवधर प्रयत्नशील आहे.

मुंबईने ८ बाद ३६२ धावसंख्येवरून मंगळवारी पहिल्या डावास पुढे प्रारंभ केला. यात आणखी ६९ धावांची भर घालून ४३१ धावसंख्या उभारली. मुलानीने फलंदाजीत ११ चौकार आणि दोन षटकारांसह ८९ धावांचे योगदान दिल्यामुळे मुंबईला ही मजल मारता आली. त्यानंतर बडोद्याची दिवसअखेर ९ बाद ३०१ अशी स्थिती होती. मंगळवारी मुलानी तळाचे फलंदाज शशांक अटार्डे (२२) आणि तुषार देशपांडे (नाबाद १८) यांच्यासह जिद्दीने किल्ला लढवला.

मग बडोद्याच्या पहिल्या डावात देवधरने झुंजार फलंदाजी करीत १८४ चेंडूंत २० चौकार आणि एका षटकारांनिशी नाबाद १५४ धावांची खेळी उभारली. देवधरला विष्णू सोलंकीचे (४८) महत्त्वपूर्ण साहाय्य लाभले. परंतु सलामीवीर आदित्य वाघमोडे, दीपक हुडा, कर्णधार कृणाल पंडय़ा आणि युसूफ पठाण यांनी निराशा केली. फिरकी गोलंदाज मुलानीने ९९ धावांत ५ बळी घेत बडोद्याच्या फलंदाजांची दाणादाण उडवली.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : १०६.४ षटकांत सर्व बाद ४३१ (शाम्स मुलानी ८९, अजिंक्य रहाणे ७९; युसूफ पठाण ३/२६, भार्गव भट ३/१२५).

बडोदा (पहिला डाव) : ६९ षटकांत ९ बाद ३०१ (केदार देवधर नाबाद १५४, विष्णू सोलंकी ४९; शाम्स मुलानी ५/९९).