सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत आदित्य तरेकडे मुंबईचे नेतृत्व

रविचंद्रन अश्विन आणि दिनेश कार्तिक यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या पुनरागमनामुळे अधिक बलवान झालेल्या तमिळनाडू संघाविरुद्ध शनिवारपासून रंगणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘ब’ गटातील सामन्यात मुंबईची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत आदित्य तरे या लढतीत मुंबईचे नेतृत्व करणार आहे.

घरच्या मैदानावर झालेल्या सलग दोन सामन्यांत दारुण पराभव पत्करल्यामुळे मुंबईचा संघ तूर्तास तीन सामन्यांतील एका विजयाच्या सहा गुणांसह गुणतालिकेत १३व्या (‘अ’ आणि ‘ब’ गट मिळून) स्थानी आहे. तमिळनाडूची अवस्था मुंबईहून बिकट असून त्यांना चार सामन्यांत दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे, तर दोन लढती अनिर्णित राखण्यात त्यांना यश आल्याने चार गुणांसह ते १६व्या क्रमांकावर आहेत.

आंतरराष्ट्रीय सामन्यांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अश्विन आणि कार्तिक यांच्या समावेशामुळे तमिळनाडूची बाजू बळकट झाली आहे. त्याचप्रमाणे विजय शंकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात अभिनव मुकुंद, बाबा अपराजित आणि टी. नटराजन यांसारख्या गुणी खेळाडूंचा समावेश आहे.

दुसरीकडे सूर्यकुमार न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय ‘अ’ संघासह रवाना झाल्यामुळे मुंबईच्या चिंतेत भर पडली आहे. पृथ्वी शॉ दुखापतीमुळे पुढील काही सामन्यांना मुकणार आहे, तर अजिंक्य रहाणेनेसुद्धा या सामन्यातून माघार घेतली आहे. याव्यतिरिक्त, मुंबईच्या संघातील श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि शिवम दुबे हे तिघे सध्या भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे तरे आणि सिद्धेश लाड या अनुभवी खेळाडूंवर मुंबईच्या फलंदाजीची प्रामुख्याने भिस्त आहे. गोलंदाजीत तुषार देशपांडे, रॉयस्टन डायस आणि शशांक अत्तार्डे यांच्या कामगिरीवर मुंबईचे भवितव्य अवलंबून असेल.

संघ

 मुंबई : आदित्य तरे (कर्णधार), सिद्धेश लाड, जय बिश्त, अक्यूब कुरेशी, हार्दिक तामोरे, शुभम रांजणे, आकाश पारकर, सर्फराज खान, शाम्स मुलानी, विनायक भोईर, शशांक अत्तार्डे, दीपक शेट्टी, तुषार देशपांडे, भुपेन लालवाणी, रॉयस्टन डायस.

 तमिळनाडू : विजय शंकर (कर्णधार), अभिनव मुकुंद, श्रीधर राजू, एल. सूर्यप्रकाश, कौशिक गांधी, बाबा अपराजित, बी. इंद्रजित, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, आर. साई किशोर, एम. सिद्धार्थ, टी. नटराजन, एन. जगदीशन, के. विघ्नेश, के. मुकुंथ, प्रदोष रंजन.

सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वा.

 स्थळ : एम. ए. चिदम्बरम स्टेडियम, चेन्नई