‘बीसीसीआय’च्या १७ जानेवारीला होणाऱ्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

नवी दिल्ली : सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी निर्माण करण्यात आलेल्या सहा जैव-सुरक्षित केंद्रांवर पुढील महिन्यापासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) गांभीर्याने विचार करीत आहे.

‘बीसीसीआय’च्या कार्यकारी परिषदेची ऑनलाइन सभा १७ जानेवारीला होणार असून, या बैठकीच्या विषयपत्रिकेवर सात मुद्दे आहेत. यापैकी देशांतर्गत क्रिकेट हंगामातील रणजी स्पर्धा तसेच कनिष्ठ आणि महिलांच्या गटांच्या स्पर्धा हे विषय ऐरणीवर असतील.

‘‘मुश्ताक अली स्पर्धेसाठीच्या सहा केंद्रांवरच फेब्रुवारीपासून रणजी करंडक स्पर्धेचे आयोजन करण्याची ९० टक्के शक्यता आहे. मुश्ताक अली स्पर्धेचीच गटवारी रणजी स्पर्धेसाठी कायम ठेवण्यात येईल,’’ अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आधी रणजीचे साखळी सामने खेळवण्यात येतील. तसेच बाद फेरीचे म्हणजेच उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामने ‘आयपीएल’नंतर होतील. त्यामुळे सर्वोत्तम खेळाडूंना रणजी स्पर्धेत खेळता येईल. यावेळी रणजी स्पर्धेच्या वेळापत्रकात कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

कार्यक्रमपत्रिकेतील मुद्दे

१. चौथ्या आणि पाचव्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीतील इतिवृत्ताला मंजुरी

२. २०२०-२१च्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाबाबत चर्चा

३.  ‘आयसीसी’च्या २०२३ ते २०३१पर्यंतच्या निर्देशांनुसार भारताच्या कार्यक्रमपत्रिकेबाबत विचारविनिमय

४. ‘आयसीसी’ स्पर्धासाठी करसवलत

५. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रकल्प

६. बिहार क्रिकेट संघटनेबाबत निर्णय

७. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणि ‘बीसीसीआय’ मुख्यालयातील नियुक्ती