वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, मिथुन मन्हास अशा अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेल्या दिल्लीवर निर्णायक विजय मिळवत रणजी क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची मुंबईला संधी आहे. ४४१ धावांच्या खडतर लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची ४ बाद ११० अशी अवस्था झाली आहे. पाचव्या आणि अंतिम दिवशी मुंबईला विजयासाठी सहा बळींची आवश्यकता आहे, तर दिल्लीला अजूनही ३३१ धावांची गरज आहे.
७ बाद ३७६ धावांवरून पुढे खेळणाऱ्या मुंबईने ७४ धावांची भर घातली. सिद्धेश लाडने आपले अर्धशतक पूर्ण केले. हरमीत सिंगने ३० तर शार्दूल ठाकूरने २० धावांची खेळी करत मुंबईला साडेचारशे धावांचा टप्पा गाठून दिला. मुंबईचा डाव ४५० धावांत संपुष्टात आला. अखिल हेरवाडकरने २५ चौकार आणि ३ षटकारांसह सर्वाधिक १६१ धावांची खेळी साकारली. श्रेयस अय्यरने ८२ धावा करत त्याला चांगली साथ दिली. दिल्लीतर्फे मनन शर्माने सर्वाधिक ४ बळी घेतले.
४४१ धावांचा पाठलाग करताना उन्मुक्त चंद आणि गौतम गंभीर यांनी ५६ धावांची सलामी दिली. मात्र विल्कीन मोटाने उन्मुक्त चंदला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. त्याच षटकात शिवम शर्माला बाद करत विल्कीनने दिल्लीला अडचणीत टाकले. गंभीरने रजत भाटियाच्या साथीने डाव सावरला. यंदाच्या हंगामात शानदार फॉर्मात असणाऱ्या शार्दूल ठाकूरने गंभीरला पायचीत केले. त्याने ३४ धावांची संयमी खेळी केली. त्याच षटकात मिथुन मन्हासला आदित्य तरेकरवी झेलबाद करत शार्दूलने दिल्लीच्या डावाला खिंडार पाडले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा रजत भाटिया २५ तर मनन शर्मा १४ धावांवर खेळत आहेत. शार्दूल आणि विल्कीन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.  वीरेंद्र सेहवागचा अपवाद वगळता दिल्लीचे प्रमुख फलंदाज तंबूत परतल्याने मुंबईच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक
मुंबई : १५६ आणि ४५० (अखिल हेरवाडकर १६१, श्रेयस अय्यर ८२, सिद्धेश लाड ५५; मनन शर्मा ४/९२) विरुद्ध दिल्ली : १६६ आणि ४ बाद ११० (गौतम गंभीर ३४, उन्मुक्त चंद ३१; विल्कीन मोटा २/३०)