21 October 2020

News Flash

दिल्ली अब दूर नहीं..

विदर्भाचा संघ जेतेपदासमीप

इंदूर येथे सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम लढतीत दिल्लीविरुद्ध अक्षय वाडकरने शतक झळकावून विदर्भ संघाला मोठी आघाडी मिळवून दिली.

विदर्भाचा संघ जेतेपदासमीप; पहिल्या डावात २३३ धावांची आघाडी; अक्षय वाडकरचे दमदार शतक; सिद्धेश नेरळ व आदित्य सरवटे यांची अर्धशतके

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाचा संघ ऐतिहासिक जेतेपद मिळवण्याच्या समीप पोहोचला आहे. अक्षय वाडकरच्या नाबाद शतकाच्या जोरावर विदर्भाने पहिल्या डावात ७ बाद ५२८ अशी दमदार मजल मारली असून त्यांच्याकडे २३३ धावांची आघाडी आहे. त्यामुळे पहिल्या डावात आघाडीच्या जोरावर ते जिंकतात की दिल्लीवर एका डावाने विजय मिळवतात, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. दिल्लीसाठी सामन्याचा तिसरा दिवसही वाईट होता. आता सामना वाचवणे त्यांच्या हातात नसल्याचे दिसत असून एखादी चमत्कारी खेळीच त्यांना तारू शकते.

रविवारी ४ बाद २०६ धावांवरून पुढे खेळताना विदर्भाच्या संघाने तिसऱ्या दिवशी मोठी मजल मारली. साऱ्यांच्या नजरा या वेळी अनुभवी वसिम जाफरवर टिकून होत्या. नवदीप सैनीच्या पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूने जाफरच्या बॅटची कडा घेतली. दुसऱ्या स्लिपमध्ये असलेल्या कुणाल चंडेलाला या वेळी झेल टिपण्याची संधी होती, पण त्याला जाफरला बाद करता आले नाही. जाफरला या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. जाफरने तिसऱ्या दिवशी १७ धावा करत एकूण ११ चौकारांच्या जोरावर ७८ धावांची खेळी साकारली. अखेर सैनीनेच जाफरला बाद करत संघाला यश मिळवून दिले.

दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतच्या नेतृत्वाच्या मर्यादा या वेळी स्पष्ट झाल्या. जाफरला बाद केल्यावर दिल्लीला सामन्यात वरचढ होण्याची संधी होती, पण पंतच्या दिशाहीन नेतृत्वामुळे ती दिल्लीला गमवावी लागली. उपहारानंतर दिल्लीचा अनुभवी खेळाडू मैदानात उतरू शकला नाही आणि त्याचा परिणाम संघावर झालेला पाहायला मिळाला.

जाफर बाद झाल्यावर वाडकर आणि आदित्य सरवटे यांनी विदर्भाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १६९ धावांची भागीदारी रचत संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. सरवटने या वेळी ११ चौकारांच्या मदतीने ७९ धावा केल्या. सरवटेला या वेळी विकास मिश्राच्या गोलंदाजीवर पंतने जीवदान दिले. सरवटे बाद झाला असला तरी वाडकर भक्कमपणे खेळपट्टीवर उभा होता. त्याने आता सिद्धेश नेरळला आपल्या साथीला घेत दिल्लीवर पुन्हा एकदा आक्रमण केले. वाडकरबरोबरच सिद्धेशनेही या वेळी दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. या दोघांनी आठव्या विकेटसाठी ११३ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाची आघाडी वृद्धिंगत केली. सिद्धेश या वेळी दोन वेळा सुदैवी ठरला. कुलवंत खेज्रोलियाच्या चेंडूवर दोनदा सिद्धेशचे झेल उडाले होते, पण या दोन्ही वेळी ‘नो बॉल’ असल्यामुळे सिद्धेशला जीवदान मिळाले. सिद्धेशने खेज्रोलियालाच कव्हर्सवर षटकार ठोकत संघाच्या पाचशे धावा फलकावर लावल्या. सिद्धेशने प्रत्येकी चार चौकार आणि षटकारांच्या जोरावर नाबाद ५६ धावांची खेळी साकारली.

वाडकरची ही खेळी अप्रतिम अशीच होती. दिल्लीच्या गोलंदाजांना त्याने कोणतीही संधी दिली नाही. आजच्या दिवसाचा वाडकर हा खऱ्या अर्थाने नायक ठरला. जाफर झाल्यावर विदर्भाच्या संघावर दडपण आले होते, पण वाडकरने ते आपल्या शतकाच्या जोरावर दूर केले. त्याने एकटय़ाने धावा केल्या असे नाही, तर त्याने सरवटे आणि सिद्धेश या दोघांना आपल्या बरोबर खेळवले. त्यांच्याशी सातत्याने संवाद साधत त्यांच्यावरचे दडपणही वाडकरने दूर केले. मिड ऑनला जोरदार फटका लगावत वाडकरने शतकाला गवसणी घातली. वाडकरने १६ चौकार आणि विकास मिश्राला लगावलेल्या एकमेव षटकाराच्या जोरावर नाबाद १३३ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली.

संक्षिप्त धावपलक

  • दिल्ली (पहिला डाव) : २९५.
  • विदर्भ (पहिला डाव) : १५६ षटकांत ७ बाद ५२८ (अक्षय वाडकर खेळत आहे १३३, आदित्य सरवटे ७९, वसिम जाफर ७८, सिद्धेश नेरळ खेळत आहे ५६; नवदीप सैनी ३/१२६).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 2:28 am

Web Title: ranji trophy final delhi vs vidarbha
Next Stories
1 नव्या वर्षांची आशा.
2 डी’व्हिलियर्सबद्दल आदर, पण तो आमच्या रडारवर
3 खेळाडूंनी व्यग्र वेळापत्रकाचा बाऊ करू नये!
Just Now!
X